अहमदाबाद : आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव झाल्यानंतर स्पर्धेच्या नियोजनावरून एक नवा वादंग निर्माण झाला आहे. क्रिकेट विश्वातील दिग्गज सुनील गावसकर यांनी थेट 'आयपीएल फायनल पुढे ढकलायला हवी होती,' असे विधान करून खळबळ उडवून दिली आहे. गुजरात टायटन्सच्या संघाने अत्यंत कमी अवधीत सलग सामने खेळल्यामुळे त्यांना पुरेशी विश्रांती आणि तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नव्हता, हा या वादाचा मुख्य केंद्रबिंदू आहे.
गुजरात टायटन्सचा संघ क्वालिफायर २ मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामना खेळल्यानंतर अहमदाबादला रवाना झाला होता. मात्र, खराब हवामानाचा फटका बसल्याने त्यांच्या प्रवासात मोठा व्यत्यय आला. ३० मे रोजी उशिरा रात्री अहमदाबादला पोहोचल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी म्हणजेच ३१ मे रोजी त्यांना आरसीबीविरुद्ध निर्णायक अंतिम सामना खेळावा लागला. या धकाधकीच्या प्रवासामुळे खेळाडूंच्या तयारीवर विपरीत परिणाम झाला, असे मत व्यक्त होत आहे. गुजरात संघाने अवघ्या ६ दिवसांत तीन महत्त्वाचे सामने खेळले होते, ज्यासाठी त्यांना वेगवेगळ्या शहरांत प्रवासही करावा लागला होता.
'इंडिया टुडे'शी संवाद साधताना सुनील गावसकर यांनी खेळाडूंच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर भाष्य केले. गावसकर म्हणाले, "अशा परिस्थितीत केवळ खेळाडूंचे शारीरिक स्वास्थ्यच नाही, तर त्यांची मानसिक एकाग्रताही विचलित होते. आपल्या विमानाचे उड्डाण कधी होणार, हेच जेव्हा खेळाडूंना ठाऊक नसते, तेव्हा साहजिकच तणाव वाढतो आणि त्याचा थेट परिणाम संघाच्या कामगिरीवर होतो."
ते पुढे म्हणाले, "खेळाडूंना पुरेसा आराम मिळणे गरजेचे असते, आणि गुजरात टायटन्सच्या बाबतीत जे घडले ते पूर्णपणे अनपेक्षित होते. जेव्हा स्पर्धेत आधीपासूनच 'रिझर्व्ह डे'ची तरतूद उपलब्ध आहे, तर खेळाच्या निष्पक्षतेचा विचार करून अंतिम सामना एक दिवस पुढे ढकलून सोमवार, १ जून रोजी खेळवता आला असता. यामुळे गुजरात टायटन्सलाही तयारीसाठी समान संधी मिळाली असती."
दुसरीकडे, गुजरात टायटन्सचे संचालक विक्रम सोलंकी यांनी पराभवानंतर आपली बाजू मांडताना वस्तुस्थितीवर प्रकाश टाकला. सोलंकी म्हणाले, "हवामानावर आमचे नियंत्रण नाही, त्यामुळे आमचे आगमन लांबणीवर पडले यात आमचा काहीही दोष नाही. कमी दिवसांत अनेक सामने खेळणे हे नक्कीच आव्हानात्मक होते. आम्ही हरलो आहोत आणि आमचा प्रवास इथेच थांबला आहे, याचे समर्थन म्हणून मी हे सांगत नाहीये. आम्हाला आरसीबीला आव्हान देण्याची संधी होती, पण त्या दिवशी आरसीबीचा खेळ सरस ठरला. आम्ही किती उशिरा पोहोचलो, या गोष्टींना आता विशेष अर्थ उरलेला नाही."
गुजरात टायटन्सच्या या पराभवामुळे आता आयपीएलच्या वेळापत्रकातील त्रुटी आणि खेळाडूंच्या वर्कलोड मॅनेजमेंटवर पुन्हा एकदा मोठ्या चर्चेला सुरुवात झाली आहे.