Sunil Gavaskar on ICC Super 8 controversy
नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बनवलेल्या 'सुपर 8' ग्रुपवरून आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणवर टीका होत आहे.आता स्पर्धेच्या या टप्प्यावर 'प्री-सीडिंग' मॉडेलवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे अनाकलनीय असल्याचे स्पष्ट करत टीका करणार्यांना सुनील गावस्करांनी चांगलेच सुनावले आहे.
ICC ने या स्पर्धेसाठी गटातील कामगिरीऐवजी स्पर्धेपूर्वीच्या मानांकनानुसार (Pre-seeding) सुपर 8 ग्रुप निश्चित केले आहेत. यामुळे एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्या गटात अव्वल ठरलेले चारही संघ (भारत, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका) एकाच गटात (ग्रुप १) आले आहेत. याउलट, दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले संघ (पाकिस्तान, श्रीलंका, इंग्लंड आणि न्यूझीलंड) दुसऱ्या गटात आहेत.
टीकाकारांच्या मते, हा नियम उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना एकप्रकारे 'शिक्षा' देणारा आहे. प्रभावी संघांना आता एकमेकांशी भिडून स्पर्धेबाहेर व्हावे लागेल, तर दुसऱ्या क्रमांकावरील संघांना उपांत्य फेरीचा मार्ग सोपा झाला आहे.
या वादावर आपली भूमिका मांडताना सुनील गावस्कर 'इंडिया टुडे'शी बोलताना म्हणाले, "हा मुद्दा आताच का उपस्थित केला जात आहे? स्पर्धेच्या सुरुवातीला हा प्रश्न का विचारला गेला नाही? जे लोक आता ओरड करत आहेत, त्यांनाच हे विचारले पाहिजे."
गावस्करांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) निर्णयांचे समर्थन करताना म्हटलं की, "ही स्पर्धा दोन देशांमध्ये खेळवली जात आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास, इमिग्रेशन, कस्टम्स आणि हॉटेल बुकिंग यांसारख्या अनेक गोष्टींचे नियोजन करावे लागते. प्रत्येक संघाचा ताफा सारखा नसतो; कोणाला ४० खोल्या लागतात तर कोणाला कमी. या सर्व तांत्रिक बाबींचा विचार करूनच ICC ने प्री-सीडिंगचा निर्णय घेतला असावा."