Sunil Gavaskar Pudhari
स्पोर्ट्स

Sunil Gavaskar : "IPLबाबत संशय घेणाऱ्यांना संधी देऊ नका.." : सुनील गावस्‍कर यांनी BCCIकडे केली मोठी मागणी

खेळाडूंच्या हाय-प्रोफाइल ट्रान्सफरदरम्यान पूर्ण पारदर्शकता बाळगण्‍याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

Sunil Gavaskar on IPL player transfer transparency : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) खेळाडूंच्या हाय-प्रोफाइल ट्रान्सफरदरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पूर्ण पारदर्शकता बाळगावी, असे आवाहन भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी केली आहे. असे केल्याने आयपीएलबाबत संशय घेणार्‍यांना संधीच मिळणार नसल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

सध्या खेळाडूंच्या ट्रान्सफरसाठी 'ट्रेडिंग विंडो'

आयपीएलमधील १० फ्रँचायझी आपल्या संघात खेळाडूंचा समावेश करण्यासाठी केवळ खेळाडूंच्या लिलावावरच (Auction) अवलंबून नसतात. सध्या खेळाडूंच्या ट्रान्सफरसाठी 'ट्रेडिंग विंडो' उघडी आहे. संघ मजबूत करण्यासाठी फ्रँचायझींचे नियोजन वर्षभर सुरू असते. आयपीएल २०२६ पूर्वी संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्समध्ये (CSK) गेला, तर हंगाम संपल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात खेळाडूंची अदलाबदल झाली. यात फिरकीपटू कुलदीप यादव लखनऊमध्ये गेला, तर यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतची दिल्ली कॅपिटल्समध्ये पुन्‍हा परतला होता.

हार्दिक पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स सोडणार असल्याच्या चर्चा

आयपीएल २०२४ पूर्वी स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याचा हाय-प्रोफाइल ट्रान्सफर प्रचंड चर्चेत राहिला होता. तो गुजरात टायटन्सकडून (GT) पाच वेळा विजेत्या ठरलेल्या मुंबई इंडियन्समध्ये (MI) परतला आणि सध्या तो मुंबईचा कर्णधार आहे. हार्दिक पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स सोडणार असल्याच्या चर्चा रंगत असल्या, तरी याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

'IPL चा द्वेष करणाऱ्यांना संधी नको '

सुनील गावस्कर यांच्या मते, आयपीएलमध्ये एखाद्या खेळाडूचा ट्रेड (व्यवहार) होतो, तेव्हा त्या रकमेची माहिती केवळ बीसीसीआय, संबंधित फ्रँचायझी आणि खेळाडूलाच असते; तर इतर संघ यापासून अनभिज्ञ असतात. अशा स्थितीत नियमांचे योग्य पालन झाले आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे ट्रान्सफरच्या आर्थिक व्यवहारांची माहिती सार्वजनिक केली पाहिजे, जेणेकरून सर्वांना खरी माहिती मिळेल आणि आयपीएलचा द्वेष करणाऱ्यांना टीका करण्याची संधी मिळणार नाही.

BCCI ने आर्थिक व्यवहार जाहीर करावेत

'मिड-डे' मधील आपल्या स्तंभात (Column) लिहिताना गावस्कर म्हणाले, "माध्यमांमध्ये खेळाडूंच्या एका फ्रँचायझीमधून दुसऱ्या फ्रँचायझीमध्ये जाण्याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. ही ट्रेडिंग विंडो बंद होण्यासाठी अजून काही वेळ बाकी आहे. एखादा खेळाडू फ्रँचायझीमधून दुसऱ्या फ्रँचायझीमध्ये गेल्याची माहिती सार्वजनिक होते; पण जेव्हा हा व्यवहार होतो, तेव्हा त्याच्या रकमेची माहिती फक्त दोन फ्रँचायझी, खेळाडू आणि बीसीसीआय यांच्यापुरतीच मर्यादित असते.अशा परिस्थितीत इतर फ्रँचायझींना प्रत्येक संघासाठी ठरवून दिलेल्या 'सॅलरी कॅप'चे (मानधन मर्यादा) पालन झाले आहे की उल्लंघन, हे समजत नाही. त्यामुळे पूर्ण पारदर्शकता राहण्यासाठी व्यवहाराची रक्कम सार्वजनिक करणे अत्यंत गरजेचे आहे. आयपीएल ही जगातील सर्वात मोठी टी-२० लीग आहे. अशा वेळी ही पारदर्शकता टिकवून ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून भारतीय लीगवर टीका करणार्‍यांना यावर बोट ठेवण्याची संधी मिळणार नाही."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT