Sunil Gavaskar Angry Again No Experiments in World Cup
मुंबई : आगामी टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघ व्यवस्थापनासमोर खेळाडूंच्या निवडीचा मोठा पेच निर्माण झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या घरगुती मालिकेत भारताने ४-१ असा दणदणीत विजय मिळवून विश्वचषकासाठी प्रबळ दावेदार असल्याचे सिद्ध केले असले, तरी यष्टिरक्षक फलंदाजाच्या जागेसाठी आता चुरस वाढली आहे. 'संजू सॅमसन की इशान किशन?' या वादात आता भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी उडी घेतली असून, त्यांनी इशान किशनच्या बाजूने आपला स्पष्ट कौल दिला आहे.
शुभमन गिलच्या प्रयोगामुळे संजू सॅमसनला फलंदाजीच्या क्रमवारीत खालच्या स्थानी ढकलण्यात आले होते. मात्र, विश्वचषकापूर्वी निवडकर्त्यांनी त्याला पुन्हा सलामीवीर म्हणून संधी दिली. दुर्दैवाने, न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत संजूला आपल्या नावाचा प्रभाव पाडता आला नाही. पाच डावांत त्याने केवळ ४६ धावा केल्या, ज्यामुळे त्याच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दुसरीकडे, संघात अचानक पुनरागमन करणाऱ्या इशान किशनने या संधीचे सोने केले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना इशानने चार डावांत तब्बल २१५ धावा कुटल्या, ज्यात एक अर्धशतक आणि एका धडाकेबाज शतकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सॅमसनचे घरचे मैदान असलेल्या तिरुवनंतपुरममध्ये इशानने शतक झळकावून संघातील आपला दावा अधिक मजबूत केला.
या वादावर भाष्य करताना सुनील गावस्कर एका वाहिनीशी बोलताना म्हणाले, ‘इशान किशनला संघातून वगळणे आता अत्यंत कठीण आहे. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत तुम्ही कोणतीही जोखीम पत्करू शकत नाही. सॅमसनकडे क्षमता आहे, मात्र सध्या तो फॉर्ममध्ये नाही. पाच सामन्यांत त्याची सर्वोच्च धावसंख्या केवळ २४ आहे आणि तो ज्या पद्धतीने बाद होत आहे, त्यावरून त्याचा आत्मविश्वास डळमळीत असल्याचे दिसते.’
गावस्कर पुढे म्हणाले की, जोपर्यंत तिलक वर्मा पूर्णपणे तंदुरुस्त होत नाही, तोपर्यंत ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामन्यासाठी सॅमसनचा अंतिम ११ मध्ये समावेश होण्याची शक्यता कमीच आहे.
अंतिम निवडीबाबत विचारले असता, भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने सावध प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ‘‘तिलक वर्माच्या प्रकृतीबाबत सध्या नेमकी माहिती नाही, परंतु त्याने फलंदाजीचा सराव सुरू केला आहे. जर तो परतला, तर आमच्यासमोर निवडीचा एक 'चांगला पेच' निर्माण होईल. आमच्या १५ सदस्यीय संघातील प्रत्येक खेळाडू अंतिम ११ मध्ये खेळण्यास सक्षम आहे. ७ तारखेलाच इशान खेळणार की नाही, हे स्पष्ट होईल.’’
भारतीय संघ आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात ७ फेब्रुवारी रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध करणार आहे.