इपोह (मलेशिया) : भारतीय हॉकी संघाने गुरुवारी इपोह (मलेशिया) येथे सुरू असलेल्या सुलतान अझलन शाह चषक स्पर्धेतील आपल्या चौथ्या सामन्यात न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या भारताकडून अमित रोहिदास (4’), संजय (32’) आणि सेल्वम कार्ती (54’) यांनी तर दहाव्या स्थानी असलेल्या न्यूझीलंडकडून जॉर्ज बेकर (42’, 48’) याने दोन गोल केले.
सामन्याच्या पहिल्या काही मिनिटांत न्यूझीलंडने अधिक आक्रमक खेळ दाखवला. मात्र, भारतीय बचावपटूंनी कोणतीही संधी न देता त्यांची आघाडी रोखली. भारताने आपल्या पहिल्या संधीचे रूपांतर पेनल्टी कॉर्नरमध्ये केले आणि अमित रोहिदासने जोरदार ड्रॅग-फ्लिकद्वारे गोल करत भारताचे खाते उघडले. यानंतर अभिषेकच्या जवळून मारलेला शॉट न्यूझीलंडच्या गोलरक्षकाने अडवल्यामुळे भारताला दुसरा गोल करता आला नाही.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये ‘ब्लॅक स्टिक्स’ (न्यूझीलंड) बरोबरी साधण्याच्या प्रयत्नात होते. त्यांना पेनल्टी कॉर्नरच्या रूपात एक संधी मिळाली. मात्र, भारतीय बचावपटूंनी ती यशस्वी होऊ दिली नाही. परिणामी, मध्यंतरापर्यंत भारताने 1-0 अशी निसटती आघाडी कायम राखली. दुसऱ्या हाफमध्ये भारताने दमदार सुरुवात करत आपली आघाडी दुप्पट केली. कर्णधार संजयने पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमध्ये केले. यानंतर न्यूझीलंडने 2 पेनल्टी कॉर्नर मिळवत त्वरित प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण ते भारतीय बचावफळीला भेदण्यात अपयशी ठरले.
भारतासाठी गोलरक्षक पवनने शानदार कामगिरी केली, पण 42 व्या मिनिटाला न्यूझीलंडच्या जॉर्ज बेकरने गोल करत त्यांची आघाडी कमी केली. चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीलाच न्यूझीलंडने पेनल्टी कॉर्नरद्वारे दुसरा गोल करण्याची संधी साधली आणि जॉर्ज बेकरच्या पुन्हा एकदा केलेल्या गोलमुळे सामना 2-2 असा बरोबरीत आला. मात्र, भारताने त्वरित प्रतिहल्ला करत अभिषेकने दिलेल्या पासवर सेल्वम कार्तीने सफाईदारपणे गोल करत भारताला पुन्हा एकदा 3-2 अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी अखेरपर्यंत कायम राहिली. या स्पर्धेत भारत आता शनिवारी आपल्या अखेरच्या गट सामन्यात कॅनडाचा सामना करेल.