T20 World Cup | पॉवर प्लेचा गेम अन् धावांचा वेग! टीम इंडियाच्या संघनिवडीत 'स्ट्राइक रेट' ठरला सर्वात मोठा फॅक्टर Pudhari File Photo
स्पोर्ट्स

T20 World Cup | पॉवर प्लेचा गेम अन् धावांचा वेग! टीम इंडियाच्या संघनिवडीत 'स्ट्राइक रेट' ठरला सर्वात मोठा फॅक्टर

उत्तम संघ निवडीबद्दल निवड समितीचे अभिनंदन

पुढारी वृत्तसेवा

निमिष पाटगावकर

बीसीसीआयच्या मुख्यालयातील कॉन्फरन्स रूममध्ये काल दुपारी एक वाजल्यापासूनच लगबग सुरू होती. कारण दुपारी दीड वाजता आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारताच्या संघाची घोषणा होणार होती. परवाचा अहमदाबादचा द. आफ्रिकेविरुद्धचा सामना संपवून कर्णधार सूर्यकुमार यादव मुंबईत आला आणि सुमारे दोन वाजता बीसीआयचे कार्यवाह देवजीत सैकिया, सूर्या आणि आगरकरबरोबर संघाची घोषणा करायला आले. देवजीत सैकियांनी संघाची घोषणा करताना दुसरेच नाव उपकर्णधार म्हणून अक्षर पटेलचे घेतले आणि समस्त पत्रकारांच्या भुवया उंचावल्या. संघाची पंधरा नावे एकदा नाही तर दोनदा त्यांनी वाचून दाखवल्यावर शुभमन गिल संघात नाही हे कळून चुकले. त्याचबरोबर जितेश शर्माची काही विशेष चूक नसताना त्यालाही वगळण्यात आले. इशान किशनचे पुनरागमन झाले आणि रिंकू सिंग आणि वॉशिंग्टन सुंदर दोघांना संधी मिळाली आहे.

भारतीय कसोटी आणि एक दिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिलला विश्रांती दिली का वगळण्यात आले हा प्रशनोत्तरांत सर्वात चर्चिलेला प्रश्न होता. गिलचा संघात समावेश नसण्यामागे त्याचा फॉर्म अथवा इतर काही कारण नाही तर निव्वळ तो संघाच्या फॉर्म्युलात बसत नाही हे उत्तर सूर्या आणि आगरकर दोघांनी दिले. गिल नुकताच मानेच्या दुखण्यातून सावरला तर त्याच्या पायाला दुखापत झाली म्हणून पुन्हा बाहेर होता. त्याची एक दिवसीय सामन्यातील कामगिरी बघता गेल्या 18 डावांत त्याला अर्धशतकी मजल मारता आलेली नाही. एकीकडे अभिषेक शर्मा वादळी फलंदाजी करत असताना दुसर्‍या बाजूने त्याला साथ द्यायला गिल कमी पडत होता. पहिल्या पॉवर प्लेचा फायदा उठवणे किती गरजेचे असते हे आपण या द. आफ्रिके विरुद्धच्या मालिकेत बघितले. दोनशे, सव्वादोनशे धावाही जर विजयाची हमी आजकाल देऊ शकत नसतील तर पहिली सहा षटके विश्वचषकात महत्त्वाची ठरणार आहेत.

अभिषेक शर्माच्या जोडीला संजू सॅमसन किंवा इशान किशन यांच्यासारखा यष्टिरक्षक सलामीवीर असला तर संघांचा धावांच्या वेगाचा आणि यष्टिरक्षकाच्या जागेचा दोन्ही प्रश्न सुटणार होते. याच कारणासाठी शुभमन गिल संघाच्या रचनेत बसत नव्हता. पत्रकार गिलबाबतच प्रश्न विचारत आहेत हे बघून निवड समितीचे प्रमुख आगरकर यांनीच यशस्वी जैस्वालही संघात नाही, पण त्याच्याबाबत कुणी विचारले नाही अशी आठवण करून दिली. ज्या फॉर्म्युल्यात गिल बसत नाही त्यात जैस्वालहि बसणार नाही तेव्हा या दोघांचाही विचार झाला नाही. हा निर्णय घ्यायला धाडस लागते कारण गिल किंवा जैस्वाल यांच्या गुणवत्तेबत्तेबद्दल कुणालाच शंका असायला नको. जर का हा डाव फसला तर निवड समिती टीकेचे धनी होईल, पण परिणामांची पर्वा न करता एका विशिष्ट मांडणीसाठी संघ निवडताना गिलसारख्याला वगळायचे धाडस दाखवल्याबद्दल प्रथम निवड समितीचे अभिनंदन.

गिलचा फॉर्म हे कारण त्याला वगळायला का नाही याचे उत्तर सूर्या आपली संघातील जागा आणि कर्णधारपद का राखून आहे याच्यात मिळते. गिलने 18 डावांत पन्नाशी गाठली नाही तर सूर्याने तब्बल 22 डावात पन्नाशी गाठली नाही. तरीही सूर्या संघात बसतो कारण त्याच्या नेतृत्वाने आणि फलंदाजीच्या क्रमाने. सूर्याची नजीकच्या काळातील आकडेवारी चिंताजनक आहे. विशेषतः जलदगती गोलंदाजांच्या विरुद्ध तो गेल्या 133 चेंडूंत 18 वेळा बाद झाला आहे, ज्यात त्याची सरासरी फक्त 8.11 आहे आणि स्ट्राईक रेट फक्त 109.77 आहे. हे सर्व असून सूर्या स्वतः वारंवार सांगत आहे की, मी फॉर्ममध्ये नाही असे नाही तर माझ्या धावा होत नाही आहेत. खरं तर या विधानाला अर्थ नाही, पण त्याचबरोबर सूर्यासारख्या फलंदाजाला परतायला एक दमदार खेळी पुरेशी आहे हे तोही स्वतः जाणतो.

अभिषेक शर्मा, इशान किशन किंवा संजू सॅमसन, तिलक वर्मा, सूर्या, पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल इतक्या दमदार फलंदाजीला आता अजून आधार मिळाला आहे तो रिंकू सिंगचा. वॉशिंग्टन सुंदर का रिंकू सिंग या पर्यायात आपण रिंकूला आशिया चषकासाठी निवडले, पण पाकिस्तानविरुद्धच्या विजयी फटाक्याशिवाय त्याला संधी मिळाली नाही. आता प्रतिस्पर्ध्यानुसार रिंकू आणि सुंदर हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. रिंकू सिंगच्या वाट्याला दहा चेंडू जरी आले तरी तो धावसंख्या तीस - पस्तीसने वाढवू शकतो. या संघनिवडीने हेही दाखवून दिले की, देशांतर्गत स्पर्धेत केलेल्या कामगिरीची दखल नक्कीच घेतली जाईल. एकेकाळी इशान किशन देशांतर्गत स्पर्धा खेळायला नाखूष होता पण त्याने स्वतःला बदलत यंदा रणजी आणि मुश्ताक अली स्पर्धेत स्वतःला झोकून देत खेळ केला. पर्यायाने तो उत्तम फॉर्ममध्ये असल्याचे निवड समितीला दिसले आणि दुसरा सलामीवीर यष्टिरक्षक असायला पाहिजे, या फॉर्म्युल्यात तो चपखल बसला. गोलंदाजीत फारसा बदल संभवत नव्हता. बुमराह, अर्शदीप, वरूण चक्रवर्ती, कुलदीप. पंड्या, अक्षर पटेल, राणा, दुबे या गोलंदाजांतून प्रतिस्पर्धी आणि खेळपट्टी बघून निवडायला बरेच पर्याय आहेत.

कुठचीही मोठी स्पर्धा जिंकायला उत्तम संघ बांधणे गरजेचे असते. त्यातून टी-20 क्रिकेट असे आहे की संघात जितके अष्टपैलू जास्त तितके चांगले. तसेही आता कुठल्याच खेळाडूला फक्त एकाच क्षेत्रात कामगिरी करून चालत नाही. 2011 चा विश्वचषक जिंकण्यासाठी धोनीने संघ जेव्हा 2008 साली बांधायला घेतला तेव्हा अनेक दिग्गजांना निरोप देऊन कटूता घेतली होती, पण भारताने विश्वचषक जिंकला होता. असेच काही कटू काही धाडसी निर्णय घ्यावे लागतात आणि ते आगरकर यांच्या समितीने करून दाखवले. या संघ निवडीने विश्वचषक जिंकण्याच्या द़ृष्टीने उत्तम संघ बांधण्याचे पहिले पाऊल आपण टाकले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT