पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील एक दशक क्रिकेट जगतामधील दिग्गज फलंदाज खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टीव्ह स्मिथने (Steve Smith retirement) आज ( दि.५ मार्च) वनडे क्रिकेटला अलविदा केला. १५ वर्षांपूर्वी म्हणजे 2010 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध लेग-स्पिनर ऑलराउंडर म्हणून पदार्पण करणाऱ्या स्मिथने पुढे जाऊन आपल्या फलंदाजीच्या प्रतिभेवर जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या हृदयात स्थान निर्माण केले. सुरुवातीला एक गोलंदाज म्हणून खेळायला आलेल्या स्मिथने आपल्या फलंदाजीतील नैसर्गिक कौशल्याने सर्वांना अचंबित केले. अनेक अविस्मरणीय खेळींची नाेंद नावावर करत ऑस्ट्रेलियाच्या महान फलंदाजांमध्ये त्याने स्थान मिळवले. ऑस्ट्रेलियाकडून खेळताना त्याच्या नावावर सध्या 17092 आंतरराष्ट्रीय धावा तसेच 63 आंतरराष्ट्रीय विकेट्स आहेत. क्रिकेटला अलविदा केला असला तरी स्टीव्ह स्मिथ कसोटी क्रिकेट खेळणार आहे.
स्टीव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. त्याने 105 कसोटी सामने खेळले असून, त्यात 9474 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 58.05 इतकी जबरदस्त आहे, जी त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे द्योतक आहे. स्मिथचा सर्वोत्तम स्कोर 239 धावा आहे, त्याने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 32 शतकं आणि 39 अर्धशतकं झळकावली आहेत. केवळ फलंदाज म्हणून नव्हे, तर गोलंदाज म्हणूनही त्याने योगदान दिले असून, त्याच्या नावावर 19 विकेट्स देखील आहेत. अजूनही तो कसोटी संघाचा कणा म्हणून खेळत राहणार आहे.
वनडे क्रिकेटमध्येही स्मिथने आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केले. त्याने 170 सामने खेळून 5800 धावा केल्या, तर त्याची सरासरी 43.28 आणि स्ट्राईक रेट 87.13 असा आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये 12 शतकं आणि 35 अर्धशतकं ठोकली आहेत. स्मिथचा सर्वोत्तम वनडे स्कोर 164 आहे. याशिवाय गोलंदाजी करत 28 विकेट्स घेत आपल्या अष्टपैलू कौशल्याची चुणूक दाखवली.
स्मिथने टी-20 क्रिकेटमध्येही आपली छाप सोडली आहे. त्याने 65 सामने खेळून 1100 धावा केल्या असून, त्याची सरासरी 25.58 आहे. टी-20 क्रिकेटमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 125.26 आहे, तर त्याचा सर्वोत्तम स्कोर 90 नाबाद आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये स्मिथच्या खात्यात 4 अर्धशतकं जमा आहेत. याशिवाय, त्याने गोलंदाजी करत 17 विकेट्स घेतल्या आहेत.
2018 साली केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान स्टीव्ह स्मिथ बॉल-टँपरिंग प्रकरणात सहभागी झाल्याचा आराेप झाला. त्यावेळी तो ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार होता; ही घटना "सँडपेपरगेट" घोटाळा म्हणून सर्वत्र ओळखली जाते. या घटनेमध्ये बॉल सोबत छेडछाड केल्यामुळे त्याला बॉल टॅम्परिंग प्रकरणामुळे त्याच्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली; पण त्यानंतर पुनरागमन करत त्याने आपला लौकिक सिद्ध केला.
स्मिथने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट्समध्ये जबरदस्त कामगिरी करत आपली ओळख निर्माण केली आहे. कसोटी, वनडे, टी-20 आणि आयपीएल – प्रत्येक फॉरमॅटमध्ये त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याच्या यशस्वी क्रिकेट कारकीर्दीने त्याला महान खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवून दिले आहे.
स्टीव्ह स्मिथची क्रिकेट कारकीर्द संघर्ष आणि यशाने भरलेली राहिली. 2010 मध्ये गोलंदाज म्हणून पदार्पण करणाऱ्या स्मिथला काही वर्षांनंतर संघातून वगळण्यात आले. मात्र, त्याने कठोर मेहनत घेत आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले आणि पुन्हा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघाचा मुख्य आधारस्तंभ बनला. 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप जिंकून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली. तसेच 2023 विश्वचषक विजेत्या संघामधील तो एक महत्वपूर्ण खेळाडू होता.
स्मिथने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी तो अजूनही कसोटी आणि टी-20 क्रिकेटमध्ये खेळत राहणार आहे. तसेच संपूर्ण जगभरातील फ्रँचायजी क्रिकेटमध्ये त्याचा अनुभव आणि कौशल्य पुन्हा दाखवणार आहे. तो विविध लीग क्रिकेटमध्येही आपला जलवा दाखवण्यास उत्सुक असेल.
स्टीव्ह स्मिथचा शेवटचा वनडे सामना ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीत भारताविरुद्ध दुबई येथे झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला आणि त्यासह स्मिथच्या वनडे कारकिर्दीचा शेवट झाला. एक काळ असा होता, जेव्हा ऑस्ट्रेलियाचा विजय स्मिथच्या बॅटवर अवलंबून असायचा, मात्र आता ऑस्ट्रेलियन संघ त्याच्या अनुभवाशिवाय खेळणार आहे.