पुढारी ऑनलाईन डेस्क : Steve Smith Century : श्रीलंकेविरुद्धच्या दुस-या कसोटीतही ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथने शतकी खेळी साकारली. त्याने 191 चेंडूंचा सामना करत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील 36 वे तर असून श्रीलंकेविरुद्धचे चौथे शतक आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत स्मिथने आता राहुल द्रविड आणि जो रूट यांची बरोबरी केली आहे.
स्मिथ हा सध्याच्या ॲक़्टीव्ह खेळाडूंमध्ये संयुक्तपणे सर्वाधिक शतके करणारा फलंदाज बनला आहे. या यादीत त्याच्यासह इंग्लंडचा फलंदाज रूटचा समावेश आहे.
गेल्या 8 डावांमधले स्मिथचे हे चौथे शतक आहे. त्याने यापूर्वी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या ब्रिस्बेन कसोटीच्या पहिल्या डावात 101 धावा केल्या. त्यानंतर त्याने मेलबर्नमध्ये 140 धावांची खेळी साकारली. यानंतर, त्याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 141 धावांची खेळी खेळली. आता त्याने दुसऱ्या कसोटीतही शतक झळकावले.
स्मिथपेक्षा जास्त कसोटी शतके फक्त कुमार संगकारा (38), पॉन्टिंग (41), जॅक कॅलिस (45) आणि सचिन तेंडुलकर (51) यांनीच केली आहेत. सक्रिय खेळाडूंमध्ये स्मिथपेक्षा पुढे कोणीही नाही, त्याने रूटची बरोबरी केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या सक्रिय फलंदाजांमध्ये स्मिथच्या जवळपासही कोणीही नाही. केन विल्यमसन 33 शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहलीने 30 शतके ठोकली आहेत.
३५ वर्षीय स्मिथने कांगारू संघाचा माजी कर्णधार पॉन्टिंगचा आणखी एक विक्रम मोडला. स्मिथ आता आशियामध्ये सर्वाधिक धावा करणारा ऑस्ट्रेलियन फलंदाज बनला आहे. 27 वी धाव घेताच स्मिथने हा विक्रम आपल्या नावावर केला. पॉन्टिंगने आशियाई भूमीवर 28 सामन्यांच्या 48 डावात 41.97 च्या सरासरीने 1889 धावा केल्या. स्मिथने आशियामध्ये 50 पेक्षा जास्त सरासरीने फलंदाजी केली आहे.
स्मिथने 2010 मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. त्याने आतापर्यंत 116 सामने खेळले आहेत. त्याने 206 डावांमध्ये 56 पेक्षा जास्त सरासरीने 10,200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने 36 शतके आणि 42 अर्धशतके झळकावली आहेत. स्मिथने इंग्लंड विरुद्ध 37 कसोटी सामन्यांमध्ये त्याच्या कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक 3417 धावा केल्या आहेत.