स्पोर्ट्स

Matheesha Pathirana ruled out : सुपर-8 मध्ये धडक मारताच यजमान श्रीलंकेला मोठा धक्का; मॅच-विनर गोलंदाज स्पर्धेबाहेर

T20 World Cup 2026 : श्रीलंकेचा सुपर-८ मधील पहिला सामना २२ फेब्रुवारी रोजी इंग्लंडविरुद्ध

रणजित गायकवाड

पल्लेकेले : टी-२० विश्वचषक २०२६ च्या मोहिमेत सलग तीन विजय नोंदवून सुपर-८ फेरीत दिमाखात प्रवेश करणाऱ्या श्रीलंका संघाला मोठा धक्का बसला आहे. पुढील महत्त्वाच्या टप्प्यापूर्वी संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला असून, यजमान देशाच्या चिंतेत भर पडली आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली आयोजित या विश्वचषकात आता साखळी फेरीचे सामने अंतिम टप्प्यात आले आहेत. यजमान श्रीलंकेने साखळी फेरीत सलग तीन सामन्यांत वर्चस्व गाजवत सुपर-८ मधील आपले स्थान निश्चित केले आहे. साखळी फेरीतील त्यांचा शेवटचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वीच श्रीलंकेचा 'यॉर्कर किंग' मथीशा पथिराना याच्या पायाच्या स्नायूंना गंभीर दुखापत झाल्याने तो संपूर्ण स्पर्धेला मुकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त

१६ फेब्रुवारी रोजी पल्लेकेले स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात श्रीलंकेने ८ गडी राखून विजय मिळवला. मात्र, याच सामन्यात गोलंदाजी करताना आपल्या स्पेलमधील चौथ्या चेंडूवर पथिरानाला त्रास जाणवू लागला. वेदना असह्य झाल्याने तो मैदानावरच बसला, त्यानंतर फिजिओनी त्याची तपासणी केली आणि त्याला मैदान सोडावे लागले. वैद्यकीय तपासणी आणि स्कॅन रिपोर्टनंतर आता पथिराना उर्वरित विश्वचषकात खेळू शकणार नसल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत श्रीलंकेचे फलंदाजी सल्लागार विक्रम राठोड यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले, ‘पथिराना स्पर्धेबाहेर जाणे ही संघासाठी मोठी हानी आहे. त्याच्या पर्यायी खेळाडूबाबत अद्याप चर्चा सुरू असून लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल.’

वानिंदू हसरंगा आधीच स्पर्धेबाहेर

श्रीलंका संघाला बसलेला हा दुसरा मोठा धक्का आहे. यापूर्वीच स्टार फिरकीपटू वानिंदू हसरंगा दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आता पथिरानाच्या अनुपस्थितीत श्रीलंकेची गोलंदाजीची धुरा कोणाच्या खांद्यावर असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

साखळी फेरीतील आपला शेवटचा सामना १९ फेब्रुवारीला झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्यानंतर, श्रीलंकेचा सुपर-८ मधील पहिला सामना २२ फेब्रुवारी रोजी पल्लेकेले स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT