SRH vs PBKS | कॉनोलीच्या शतकानंतरही पंजाब पराभूत; सनरायझर्स हैदराबादची अव्वलस्थानी झेप 
स्पोर्ट्स

SRH vs PBKS | कॉनोलीच्या शतकानंतरही पंजाब पराभूत; सनरायझर्स हैदराबादची अव्वलस्थानी झेप

पंजाबचा सलग तिसरा पराभव

पुढारी वृत्तसेवा

हैदराबाद; वृत्तसंस्था : कूपर कॉनोलीने आक्रमक शतक झळकावल्यानंतरही सनरायझर्स हैदराबादने येथे आयपीएल साखळी सामन्यात पंजाब किंग्जला पराभवाचा जबरदस्त झटका देत गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप घेतली. प्रारंभी, क्लासेन (69) व किशनच्या (55) तडफदार अर्धशतकांच्या बळावर सनरायझर्स हैदराबादने 4 बाद 235 धावांचा डोंगर रचला. प्रत्युत्तरात कॉनोलीच्या शतकानंतरही पंजाबला 7 बाद 202 धावांवर समाधान मानावे लागले.

कॉनोलीने 59 चेंडूंत 107 धावा फटकावल्या. पण, त्याची ही खेळी संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकली नाही. पंजाबच्या अन्य फलंदाजांनी केलेली निराशा याला प्रामुख्याने कारणीभूत ठरली. प्रारंभी, पंजाब किंग्जच्या क्षेत्ररक्षकांनी सोडलेल्या सुटलेल्या झेलांचा पुरेपूर फायदा उठवत सनरायझर्स हैदराबादने 4 बाद 235 धावांचा डोंगर उभा केला. हेन्रिक क्लासेन आणि इशान किशन या जोडीने पंजाबच्या कमकुवत क्षेत्ररक्षणाचे वाभाडे काढत स्फोटक अर्धशतके ठोकली.

हैदराबादची तुफानी सुरुवात

अभिषेक शर्मा (13 चेंडूंत 35) आणि ट्रॅव्हिस हेड (19 चेंडूंत 38) यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. अर्शदीप सिंग आणि मार्को जॅनसेन या वेगवान गोलंदाजांना लक्ष्य करत त्यांनी झटपट अर्धशतकी भागीदारी रचली. त्यानंतर हेन्रिक क्लासेनने 43 चेंडूंत 69 तर इशान किशनने 32 चेंडूंत 55 धावा कुटल्या. अखेरच्या षटकांत नितीश रेड्डीने 13 चेंडूंत नाबाद 29 धावांची छोटी खेळी करून धावसंख्या 235 पर्यंत नेली.

गोलंदाजांची धुलाई

हैदराबादच्या फलंदाजांनी डावात एकूण 17 षटकार ठोकले. दुसरीकडे पंजाबचे मुख्य गोलंदाज महागडे ठरले. मार्को जॅनसेनने एकाही बळीशिवाय 61, तर अर्शदीप सिंगने 43 धावा दिल्या. या दोघांनी मिळून आपल्या 8 षटकांत 100 हून अधिक धावा बहाल केल्या.

पंजाबचे क्षेत्ररक्षक ठरले ‘व्हिलन’

संपूर्ण स्पर्धेत खराब क्षेत्ररक्षणामुळे चर्चेत असलेल्या पंजाब किंग्जने येथे पुन्हा तीन जीवदाने दिली. शशांक सिंगने एक साधा झेल सोडला, तर प्रभसिमरन सिंगला यष्टिचीत करण्याची सोपी संधी साधता आली नाही. यामुळे फिरकीपटू यजुवेंद्र चहल कमालीचा संतापलेला दिसला. चहलने 4 षटकांत केवळ 32 धावा देऊन 1 बळी घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT