सिडनी; वृत्तसंस्था : कसोटी, वन-डे व टी-20 अशा तिन्ही प्रकारांत मिळून एकत्रित 718 आंतरराष्ट्रीय बळी घेणार्या महान जलद गोलंदाज ब्रेट ली याचा रविवारी ‘ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला. ब्रेट ली 2003 व 2007 मधील विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा महत्त्वाचा सदस्य राहिला आहे.
सध्या 49 वर्षांचा असलेला ली डिसेंबर 1999 ते जुलै 2012 या काळात ऑस्ट्रेलियाकडून खेळला. त्याने मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारताविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. नंतर तो ऑस्ट्रेलियाच्या सुवर्णयुगाचा एक महत्त्वाचा स्तंभ बनला. 2003 च्या ‘आयसीसी’ वर्ल्डकपमध्ये रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील सर्व 10 सामने खेळताना, त्याने ऑस्ट्रेलियातर्फे सर्वाधिक 22 बळी घेतले आणि स्पर्धेत एकूण दुसर्या क्रमांकावर राहिला.
ब्रेट लीने 76 कसोटी सामन्यांत 30.81 च्या सरासरीने 310 बळी घेतले. याशिवाय, 221 वन- डे सामन्यांमध्ये, त्याने 23.36 च्या सरासरीने 380 बळी आणि 25 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 28 बळी मिळवले. 2007 टी-20 विश्वचषकात तो बांगला देशविरुद्ध हॅट्ट्रिक घेणारा पहिला गोलंदाज बनला.
या सन्मानामुळेे ब्रेट ली आता ‘हॉल ऑफ फेम’मधील डॉन ब्रॅडमन, डेनिस लिली, शेन वॉर्न, रिकी पाँटिंग, स्टीव्ह वॉ, मायकेल हसी आणि इयान व ग्रेग चॅपेल यांसारख्या प्रतिष्ठित खेळाडूंच्या मांदियाळीत दाखल झाला आहे.