FIFA World Cup 2026 Spain vs France semifinal Result file photo
स्पोर्ट्स

FIFA World Cup 2026: एमबाप्पेच्या फ्रान्सला धूळ चारत स्पेन अंतिम फेरीत

Spain vs France semifinal Result: मैदानावरील आक्रमकता आणि शिस्तबद्ध खेळाच्या जोरावर स्पेनने उपांत्य सामन्यात फ्रान्सचा २-० असा पराभव केला.

मोहन कारंडे

FIFA World Cup 2026 Spain vs France semifinal Result

डॅलस: मैदानावरील आक्रमकता आणि शिस्तबद्ध खेळाच्या जोरावर स्पेनने उपांत्य सामन्यात फ्रान्सचा २-० असा पराभव केला. या विजयासह स्पेनने तब्बल १६ वर्षांनंतर फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. पहिल्या सत्रात मिकेल ओयारझाबालने पेनाल्टीवर केलेला गोल आणि दुसऱ्या सत्रात पेड्रो पोरोने मारलेला उत्कृष्ट गोल स्पेनच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरले. या पराभवामुळे फ्रान्सचे सलग तिसऱ्यांदा फायनल गाठण्याचे स्वप्न भंगले आहे.

फ्रान्सवर स्पेनचे वर्चस्व कायम

युरो २०२४ ची उपांत्य फेरी आणि गेल्या वर्षीच्या नेशन्स लीगपाठोपाठ, स्पेनने सलग तिसऱ्या मोठ्या स्पर्धेत फ्रान्सला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. स्पेनच्या लॅमिन यामाल याने पुन्हा एकदा आपल्या खेळाची जादू दाखवली. 'फ्रान्सने स्पॅनिश संघाला घाबरले पाहिजे,' हा आपला सामन्यापूर्वीचा इशारा यामालने मैदानात खरा करून दाखवला.

सामन्याच्या २२ व्या मिनिटाला यामालच्या चपळाईमुळे फ्रान्सच्या बचावफळीची तारांबळ उडाली. फ्रान्सचा अनुभवी बचावपटू लुकास डिग्ने याने स्वतःच्या डी-बॉक्समध्ये हेडर मारताना मोठी चूक केली. याचा फायदा घेत पाठीमागून वेगाने आलेल्या यामालने चेंडूवर ताबा मिळवला. चेंडू क्लिअर करण्याच्या घाईत डिग्नेचा पाय यामालला लागला आणि पंचांनी थेट पेनाल्टी बहाल केली. मिडफिल्डर मिकेल ओयारझाबालने कोणतीही चूक न करता गोलरक्षकाला चकवून चेंडू जाळ्यात धाडला. चालू विश्वचषकातील ओयारझाबालचा हा पाचवा गोल ठरला.

एमबाप्पे फिका पडला, पोरोचा दुसरा गोल

जगातील पहिल्या क्रमांकाचा संघ असलेल्या फ्रान्सला या सामन्यात आपली लय सापडली नाही. स्पेनच्या अभेद्य बचावफळीने फ्रान्सचा स्टार स्ट्रायकर किलियन एमबाप्पेला पूर्णपणे शांत ठेवले. ५८ व्या मिनिटाला पेड्रो पोरोने डॅनी ओल्मोसोबत सुंदर 'गिव्ह-अँड-गो' पासिंगचा नमुना पेश करत एक शक्तिशाली शॉट मारला आणि स्पेनची आघाडी २-० अशी मजबूत केली. त्यानंतर काही वेळातच यामालने तिसरा गोल केला होता, मात्र तो 'ऑफसाईड' घोषित करण्यात आला. सामन्याच्या उत्तरार्धात फ्रान्सने गोल करण्यासाठी आक्रमक प्रयत्न केले, परंतु स्पेनचा बचाव भेदण्यात त्यांना अपयश आले.

विजेतेपदाच्या महामुकाबल्यासाठी स्पेनचा संघ आता न्यू जर्सी येथील मेटलाईफ स्टेडियमवर पोहोचेल. रविवारी होणाऱ्या या अंतिम सामन्यात स्पेनचा सामना गतविजेता अर्जेंटिना किंवा इंग्लंड यांच्यातील विजेत्याशी होईल. दुसरीकडे, पराभूत फ्रान्सला शनिवारी मियामी येथे तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात खेळावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT