स्पोर्ट्स

द.आफ्रिकेच्या फलंदाजाची डेब्यू वनडे सामन्यात विक्रमी दीड शतकी खेळी

Matthew Breetzke : ठोकले 11 चौकार, 5 षटकार!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण आफ्रिकेचा युवा सलामीवीर मॅथ्यू ब्रिट्झकेने न्यूझीलंडविरुद्धच्या पदार्पणातच इतिहास रचला. त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई करत 150 धावांची विक्रमी खेळी केली. तो त्याच्या पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात दीड शतकी खेळी करणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. 26 वर्षीय फलंदाजाने एबी डिव्हिलियर्सच्या शैलीत चौकार आणि षटकारांचा वर्षाव केला.

पाकिस्तानमध्ये एकदिवसीय तिरंगी मालिका खेळली जात आहे. सोमवारी (दि. 10) दुसरा सामना न्यूझीलंड आणि द. आफ्रिका यांच्यात खेळला गेला. द. आफ्रिकेने मॅथ्यू ब्रिट्झकेला पदार्पणाची संधी दिली. सलामीवीर म्हणून मैदानात आल्यानंतर, ब्रीट्झकेने त्याच्या पहिल्याच सामन्यात एक संस्मरणीय शतक झळकावले आणि एक विश्वविक्रम रचला. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर त्याने 148 चेंडूत 11 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने दीड शतक फटकावले. तो एकदिवसीय पदार्पणात 150 धावा करणारा पहिला खेळाडू ठरला. ब्रीट्झके वगळता, एकदिवसीय क्रिकेटच्या 53 वर्षांच्या इतिहासात इतर कोणताही फलंदाज अशी कामगिरी करू शकलेला नाही.

वनडे पदार्पणात शतक करणारा चौथा द. आफ्रिकेचा फलंदाज

मॅथ्यू ब्रीट्झके हा एकदिवसीय पदार्पणात शतक करणारा चौथा दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज ठरला. त्याच्या आधी, कॉलिन इंग्रामने हा पराक्रम केला होता ज्याने 2010 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 124 धावा केल्या होत्या. तर सध्याचा कर्णधार टेम्बा बावुमाने 2016 मध्ये आयर्लंडविरुद्ध 113 धावांची खेळी केली होती. 2018 मध्ये रीझा हेंड्रिक्सने श्रीलंकेविरुद्ध 102 धावा केल्या होत्या.

एकदिवसीय पदार्पणात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

  • 150 - मॅथ्यू ब्रिएट्झके, 2025

  • 148 - डेसमंड हेन्स, 1978

  • 127 – रहमानउल्लाह गुरबाज, 2021

  • 124* - मार्क चॅपमन, 2015

  • 124 - कॉलिन इंग्राम, 2010

  • 122* - मार्टिन गुप्टिल, 2009

आयपीएलमध्ये लखनौकडून खेळणार

आयपीएलमध्ये, ब्रीट्झके लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) कडून खेळताना दिसेल. एलएसजीने त्याला लिलावात 57 लाख रुपयांना विकत घेतले आणि त्याच्या संघात त्याचा समावेश केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT