दक्षिण आफ्रिकेकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा file photo
स्पोर्ट्स

SA vs WI | तीन दिवसांत ४० विकेटस्; दक्षिण आफ्रिकेकडून वेस्ट इंडिजचा धुव्वा

पुढारी वृत्तसेवा

गयाना : दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धची 25 वर्षांची अपराजित मालिका कायम राखली आहे. आफ्रिकेने दुसर्‍या कसोटीत 40 धावांनी विजय मिळवून मालिका 1-0 अशी जिंकली. आफ्रिका व विंडीज यांच्यातली दुसरी कसोटी 3 दिवसांत संपली आणि दोन्ही संघांच्या मिळून एकूण 40 विकेटस् पडल्या.

कसोटीच्या पहिल्या दिवशीच 17 विकेटस् पडल्या होत्या. गोलंदाजांचे वर्चस्व असलेल्या या सामन्यात विंडीजच्या 22 वर्षीय जेडन सिल्सने 9 विकेटस् घेतल्या. दक्षिण आफ्रिकेने सलग 10 कसोटी मालिकांमध्ये वेस्ट इंडिजवर विजय मिळवला आहे आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023-25 मधील हा त्यांचा दुसरा विजय ठरला. या कसोटी मालिकेत केशव महाराजने सर्वाधिक 13 विकेटस् घेतल्याने त्याला ‘मॅन ऑफ दी सीरिज’चा मान मिळाला. वेस्ट इंडिजच्या सिल्सने या मालिकेत 12 विकेटस् घेतल्या आहेत.

विंडीजच्या गोलंदाजांनी आफ्रिकेचा पहिला डाव 160 धावांत गुंडाळला. शमार जोसेफने 33 धावांत 5 विकेटस् घेतल्या, तर सिल्सने 3 बळी टिपले; पण आफ्रिकन गोलंदाजांनी विंडीजला आघाडी मिळवू दिली नाही. जेसन होल्डरच्या नाबाद 54 धावांनंतरही विंडीजला 144 धावाच करता आल्या. वियान मल्डरने 4, नांद्रे बर्गरने 3, तर केशव महाराजने 2 विकेटस् घेतल्या.

आफ्रिकेने दुसर्‍या डावात 246 धावा केल्या. एडन मार्कराम व कायले वेरेयन्ने यांच्या अर्धशतकाला टोनी डी जॉर्जी (39), मल्डर (34) यांची साथ मिळाली. जेडन सिल्सने सहा विकेटस् घेतल्या. 262 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विडींजचा डाव 222 धावांवर गडगडला आणि आफ्रिकेने 40 धावांनी विजय मिळवला. गुदाकेश मोतीने 45 धावांची खेळी केली. आफ्रिकेच्या रबाडा व महाराज यांनी प्रत्येकी 3 विकेटस् घेतल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT