कोलकाता; वृत्तसंस्था : सलामीवीर फिन अॅलनने अवघ्या 33 चेंडूंत ठोकलेल्या नाबाद 100 धावांच्या जोरावर न्यूझीलंडने टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडाक्यात प्रवेश केला. ईडन गार्डन्सवर रंगलेल्या या पहिल्या उपांत्य लढतीत किवीज संघाने द. आफ्रिकेला 20 षटकांत 8 बाद 169 धावांवर रोखले आणि 170 धावांचे लक्ष्य केवळ एका गड्याच्या बदल्यात 12.5 षटकांतच पूर्ण केले.
फिन अॅलनने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 8 उत्तुंग षटकार खेचत आफ्रिकन गोलंदाजांची दाणादाण उडवली. त्याला सलामीवीर टीम सायफर्टने (58 धावा) मोलाची साथ दिली. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाला (1/28) एकमेव बळी मिळवता आला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्या दक्षिण आफ्रिकेची अवस्था 11 व्या षटकात 5 बाद 77 अशी बिकट अवस्था झाली होती. मात्र, मार्को यान्सनने 30 चेंडूंत 55 धावांची नाबाद खेळी करत संघाला 169 धावांपर्यंत पोहोचवले होते. डेवाल्ड ब्रेविसने 34, तर ट्रिस्टन स्टब्सने 29 धावांचे योगदान दिले. रचिन रवींद्र, कोल मॅककॉन्ची आणि मॅट हेन्री यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
हा खेळ आकड्यांचा
3 क्विंटन डी कॉक या टी-20 वर्ल्डकपमधील 5 सामन्यांत तब्बल 3 वेळा फिरकी गोलंदाजाविरुद्ध बाद झाला आहे.
175.16 : टी-20 विश्वचषकात मार्करामचा 175.16 हा स्ट्राईक रेट स्पर्धेतील 84 सलामीवीरांमध्ये सर्वोत्तम ठरला आहे. किमान 100 चेंडू खेळलेल्या सलामीवीरांच्या योगदानाचा यात विचार करण्यात आला आहे.
42 : न्यूझीलंडच्या जेम्स नीशमची 3 षटके बरीच महागडी ठरली. या 3 षटकांत त्याने तब्बल 42 धावा मोजल्या.
19 : झंझावाती शतक झळकावणार्या अॅलन फिनने आपल्या डावात 19 चेंडूंतच अर्धशतक साजरे केले. यंदाच्या विश्वचषकातील त्याचे हे संयुक्त जलद अर्धशतकही ठरले.
84 : न्यूझीलंडने 170 धावांचा पाठलाग करताना पॉवर प्लेच्या पहिल्या 6 षटकांतच 84 धावांची आतषबाजी केली आणि हा देखील स्पर्धेतील आणखी एक नवा विक्रम ठरला.
117 : विजयासाठी 170 धावांचे आव्हान असताना शतकवीर फिन अॅलन व अर्धशतकवीर सायफर्ट यांनी 9.1 षटकांतच 117 धावांची बेधडक शतकी सलामी दिली आणि हाच या सामन्याचा निर्णायक टप्पा ठरला.