पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाच्या तिलक वर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात दमदार शतक झळकावले. आंतरराष्ट्रीय टी-20 मधील हे त्याचे सलग दुसरे शतक ठरले. T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग दोन शतके झळकावणारा तो भारताचा दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी त्याने सेंच्युरियनच्या मैदानावर नाबाद 107 धावांची खेळी केली होती.
वेगवान धावा काढण्याच्या प्रयत्नात अभिषेक शर्मा बाद झाला त्यानंतर तिलक मैदानात उतरला. त्याने संजू सॅमसनसह 200 हून अधिक धावांची भागीदारी केली. यादरम्यान, संजूने पहिला तर त्यानंतर लगेचच तिलकने शतक पूर्ण केले. सॅमसनने 51 चेंडूत 6 चौकार आणि 8 षटकार मारून शतक पूर्ण केले, तर वर्माने 41 चेंडूत 6 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले.
सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्यात दुस-या विकेटसाठी 210 धावांची विक्रमी भागीदारी झाली. या शतकी खेळीसह तिलकने मोठा विक्रम आपल्या नावावर केला. टी-20 शतके झळकावण्याच्या बाबतीत, तो रोहित शर्मा (5), सूर्यकुमार यादव (4), सॅमसन (3) आणि केएल राहुल (2) यांच्या मागे आहे.