पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs SA T20 : टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने जोहान्सबर्गच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इतिहास रचला. त्याने अवघ्या 34 दिवसांत तिसरे शतक झळकावून कहर केला. या फलंदाजाने 51 चेंडूत तिसरे टी-20 शतक पूर्ण केले. याआधी संजूने बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शतके झळकावली होती. संजूने आपल्या डावात 6 चौकार आणि 8 षटकार मारले आणि 196.08 च्या स्ट्राइक रेटने धावा वसूल केल्या. आफ्रिकन संघाविरुद्धच्या याआधीच्या दोन्ही सामन्यात संजू खाते न उघडता तंबूत परतला होता.
सध्याच्या मालिकेतील सॅमसनचे हे दुसरे शतक आहे. तसेच आंतरराष्ट्रीय टी-20 मधील त्याचे हे तिसरे शतक ठरले आहे. या खेळीदरम्यान सॅमसनने तिलक वर्मासोबत दुसऱ्या विकेटसाठी दीडशेहून अधिक धावांची भागीदारी केली.
गेल्या पाच डावांत तीन शतके झळकावणारा सॅमसन आता भारतीयांकडून सर्वाधिक टी-20 शतकांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. त्याने केएल राहुलला (दोन शतके) मागे टाकले आहे.
सॅमसनने डरबनच्या किंग्समीड मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात शतक झळकावले होते. त्यानंतर पुढच्या 2 सामन्यांमध्ये त्याला खातेही उघडता आले नाही. तर जोहान्सबर्गमध्ये त्याने पुन्हा एकदा आपल्या बॅटने चमत्कार दाखवत शतक झळकावले. संजूने 109 धावांच्या नाबाद खेळीत 6 चौकार आणि 9 शानदार षटकार ठोकले. यासह संजू हा भारतीय क्रिकेटमधील पहिला खेळाडू ठरला आहे ज्याने एकाच संघाविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दोनदा शतकी खेळी केली आहे.
सॅमसन आता T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात तीन शतके झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे, त्याने द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत 2 शतके झळकावली. गेल्या महिन्यात बांगलादेशविरुद्धच्या T20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याने पहिले T20 आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते. आपल्या तिसऱ्या शतकासह संजूने रोहित शर्मा, रिले रोसो, सूर्यकुमार यादव आणि कॉलिन मुनरो यांचे विक्रम मोडीत काढले. त्यांनी एका वर्षात दोन T20 आंतरराष्ट्रीय शतके झळकावली होती.
रोहित शर्मा : 5
सूर्यकुमार यादव : 4
संजू सॅमसन : 3
तिलक वर्मा : 2
केएल राहुल : 2