स्पोर्ट्स

Rohit Sharma's Big loss : सुपर 8 मधील द. आफ्रिकेच्या विजयाने रोहित शर्माचे मोठे नुकसान, काय आहे नेमके कारण?

टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील हा भारताचा सर्वात मोठा पराभव ठरला आहे.

रणजित गायकवाड

अहमदाबाद : टी-२० विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य राहिलेल्या भारतीय संघाला अखेर पराभवाचा कडू घास गिळावा लागला आहे. 'सुपर-८' फेरीतील अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा धुव्वा उडवत ७६ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

आयसीसी टी-२० विश्वचषकात सलग विजयाची सवय लागलेल्या भारतीय चाहत्यांसाठी हा निकाल अत्यंत धक्कादायक ठरला आहे. या स्पर्धेतील भारताचा हा पहिलाच पराभव असून, धावसंख्येच्या फरकानुसार टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील हा भारताचा सर्वात मोठा पराभव ठरला आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १८७ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजी पत्त्यासारखी कोसळली आणि संपूर्ण संघ १८.५ षटकांत अवघ्या १११ धावांत गारद झाला. या पराभवामुळे भारताची विजयाची मालिका खंडित झाली.

एडन मार्करमने रोहित शर्माला टाकले मागे

भारतावर विजय मिळवताच द. आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. कर्णधार म्हणून टी-२० विश्वचषकातील हा त्याचा १३ वा विजय ठरला. यासह त्याने रोहित शर्माला मागे टाकत या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या कर्णधारांच्या यादीत वरचे स्थान पटकावले आहे. रोहित शर्माच्या नावावर १४ सामन्यांत १२ विजय आहेत, तर मार्करमने केवळ १४ सामन्यांत १३ विजय नोंदवून आपली छाप पाडली आहे.

टी-२० विश्वचषकात सर्वाधिक विजय मिळवणारे कर्णधार

  • एमएस धोनी (भारत) : २१ विजय (३३ सामने)

  • केन विल्यमसन (न्यूझीलंड) : १४ विजय (२१ सामने)

  • एडन मार्करम (द. आफ्रिका) : १३ विजय (१४ सामने)

  • रोहित शर्मा (भारत) : १२ विजय (१४ सामने)

  • डॅरेन सॅमी (वेस्ट इंडिज) : १२ विजय (१८ सामने)

  • दासुन शनाका (श्रीलंका) : १२ विजय (२१ सामने)

सामन्याचा थोडक्यात आढावा

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा द. आफ्रिकेचा निर्णय सुरुवातीला भारतीय गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. द. अफ्रिकेची अवस्था ३ बाद २० अशी होती. पण त्यानंतर डेव्हिड मिलरने ३५ चेंडूंत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६३ धावांची झंझावाती खेळी केली. त्याला डेवाल्ड ब्रेविस (४५ धावा) आणि ट्रिस्टन स्टब्स (नाबाद ४४ धावा) यांची मोलाची साथ लाभली. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ३ बळी घेतले, मात्र तो आफ्रिकेची धावगती रोखण्यात अपयशी ठरला.

१८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजी पूर्णपणे विस्कळीत झाली. भारताचे पहिले ५ फलंदाज अवघ्या ५१ धावांत तंबूत परतले होते. शिवम दुबेने सर्वाधिक ४२ धावांची झुंजार खेळी केली, परंतु ती संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरली नाही. दक्षिण आफ्रिकेच्या मार्को येनसनने भेदक मारा करत ४ गडी बाद केले आणि भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT