पुढारी ऑनलाईन डेस्क : South Africa Squad Champions Trophy : 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर करण्यात आला आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी 13 जानेवारी रोजी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. या स्पर्धेत टेम्बा बावुमा द. आफ्रिकेचे नेतृत्व करेल. यापूर्वी ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंडनेही आपले संघ जाहीर केले आहेत.
बावुमाच्या नेतृत्वाखाली, दक्षिण आफ्रिकेने 2023-25 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, जिथे त्यांचा सामना जून महिन्यात ऑस्ट्रेलियाशी होईल.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी द. आफ्रिकेचा संघ खूपच मजबूत दिसत आहे. वेगवान गोलंदाज एन्रिक नोर्किया आणि लुंगी एनगिडी यांच्या पुनरागमनामुळे संघ बळकट झाला आहे. सप्टेंबर 2023 नंतर नोर्किया पहिल्यांदाच एकदिवसीय संघात सामील झाला आहे. त्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे तो 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकालाही मुकला होता. तर लुंगी एनगिडी पाठीच्या दुखापतीमुळे ऑक्टोबर 2024 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता.
द. आफ्रिकेने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या गटातील खेळाडूंनाच कायम ठेवले आहे. त्या विश्वचषकाचा भाग असलेल्या 10 खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. या संघात टोनी डी जोरजी, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स आणि विआन मुल्डर सारखे नवीन खेळाडू आहेत, जे पहिल्यांदाच 50 षटकांच्या आयसीसी स्पर्धेत सहभागी होतील.
‘हा संघ अनुभवाने समृद्ध आहे. अनेक खेळाडूंनी दबावाच्या परिस्थितीत चांगली कामगिरी केली आहे. अशा स्पर्धेत अनुभव अमूल्य असतो. 2023 च्या विश्वचषक संघाच्या कोअर ग्रुपला राखण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. संघात नवीन प्रतिभावान खेळाडू देखील आहेत. द. आफ्रिकन संघ जागतिक स्पर्धांच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचण्यास सक्षम आहे. आयसीसी स्पर्धांमधील अलीकडील कामगिरीवरून हे स्पष्ट झाले आहे. आम्ही विजेतेपद जिंकण्याच्या आमच्या प्रयत्नात पुढे जाण्यास उत्सुक आहोत.’रॉब वॉल्टर
टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी जोरजी, मार्को जानसेन, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेव्हिड मिलर, वियान मुल्डर, लुंगी एनगिडी, एनरिक नोर्किया, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रॅसी व्हॅन डर ड्यूसेन.
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये द. आफ्रिकेला ग्रुप बी मध्ये स्थान देण्यात आले आहे. या गटात अफगाणिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे. द. आफ्रिका आपला पहिला सामना 21 फेब्रुवारी रोजी कराची येथे अफगाणिस्तानविरुद्ध खेळेल. त्यानंतर 25 फेब्रुवारी रोजी रावळपिंडीमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागेल. द. आफ्रिकेचा संघ आपला शेवटचा गट सामना इंग्लंडविरुद्ध 1 मार्च रोजी कराची येथे खेळेल.