हुबळी : जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबी सध्या आपल्या धारदार गोलंदाजीने भारतीय संघाचा दरवाजा ठोठावत आहे. नबीची उत्कृष्ट कामगिरी पाहून बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. आकिब नबीला भारतीय संघात संधी देण्याची हीच योग्य वेळ असल्याचे 'दादा'ने म्हटले आहे.
रणजी करंडक २०२५-२६ च्या कर्नाटकविरुद्धच्या अंतिम सामन्यात आकिब नबीने भेदक मारा करत ५४ धावांत ५ बळी टिपले. त्याच्या या कामगिरीमुळे जम्मू-काश्मीरने पहिल्या डावात मोठी आघाडी मिळवली असून ते आता आपल्या पहिल्या ऐतिहासिक विजेतेपदाच्या उंबरठ्यावर आहेत. हुबळीच्या ज्या खेळपट्टीवर कर्नाटकचे गोलंदाज हतबल दिसले आणि त्यांनी ५८४ धावा मोजल्या, त्याच खेळपट्टीवर नबीने चेंडू दोन्ही बाजूंना वळवून फलंदाजांना नाचवले. त्याने के.एल. राहुल, मयांक अग्रवाल आणि करुण नायर यांसारख्या कसोटीपटूंना तंबूचा रस्ता दाखवला.
नबीच्या कामगिरीने प्रभावित होऊन सौरव गांगुली यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले की, ‘कठोर परिश्रम आणि जिद्द काय करू शकते, हे जम्मू-काश्मीरने जगाला दाखवून दिले आहे. या संघाने आपल्या प्रदेशाचा मान वाढवला आहे. कठीण परिस्थितीच कणखर माणसे घडवते. आकिब नबी आता भारतीय संघाच्या जर्सीच्या दिशेने वाटचाल करत आहे. आगामी उन्हाळ्यात इंग्लंडचा दौरा ही त्याच्यासाठी सर्वोत्तम सुरुवात ठरेल.’
गांगुली यांनी आपल्या पोस्टमध्ये अजित आगरकर आणि बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनाही टॅग केले आहे.
जुलै २०२६ मध्ये भारत इंग्लंड दौऱ्यावर मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे. या वातावरणात आकिबची स्विंग गोलंदाजी प्रभावी ठरेल, असा विश्वास गांगुलींनी व्यक्त केला आहे.
आकिब नबीने या हंगामात आतापर्यंत ६० बळी घेतले आहेत. रणजी करंडकाच्या ९२ वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात एकाच हंगामात ६० बळी घेणारा तो केवळ तिसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. या हंगामात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी आहे. त्याच्या या कामगिरीमुळे जम्मू-काश्मीरचा संघ पहिल्यांदाच रणजी चॅम्पियन बनण्याच्या ऐतिहासिक उंबरठ्यावर उभा आहे.
आकिबच्या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल आयपीएल लिलावातही घेण्यात आली आहे. आगामी हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सने त्याला ८.४० कोटी रुपयांची मोठी बोली लावून आपल्या ताफ्यात सामील केले आहे. आता रणजीनंतर आयपीएलच्या मैदानातही नबीच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष असणार आहे.
भारतीय संघ आगामी काळात श्रीलंका आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. नबीने ज्या प्रकारे दिग्गज फलंदाजांना बाद केले आहे, ते पाहता कसोटी संघातही त्याच्या नावाचा गांभीर्याने विचार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.