Sourav Ganguly on Mohammed Shami : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी संघात स्थान मिळालेले नाही. विशेष म्हणजे शमीने भारताबद्दल शेवटचा सामना चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये खेळला होता. त्यानंतर तो सातत्याने संघाबाहेरच राहिला आहे. आता यावरुनच भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी शमीची पाठराखण करत टीम इंडियाच्या निवडकर्त्यांना खडे बोल सुनावले आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी वृत्तसंस्था 'पीटीआय'शी बोलताना सांगितले की, मोहम्मद शमीची भारतीय संघात तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी-२०) संघात समावेश झाला पाहिजे. तो उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे. तो तंदुरुस्त आहे आणि रणजी करंडकाच्या तीन सामन्यांमध्ये आम्ही पाहिले की त्याने एकट्याच्या जोरावर बंगालला विजय मिळवून दिला आहे, असेही गांगुली यांनी स्पष्ट केले.
"मला खात्री आहे की निवडकर्ते यावर लक्ष देत असतील आणि शमी व निवडकर्त्यांमध्ये चर्चा देखील झाली असेल. पण जर तुम्ही मला विचाराल, तर तंदुरुस्ती आणि कौशल्याच्या बाबतीत शमीमध्ये आजही तीच क्षमता आहे. तो कसोटी, एकदिवसीय आणि टी-२०, या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतासाठी खेळू नये, असे कोणतेही कारण दिसत नाही. त्याचे कौशल्य खूप मोठे आहे, असेही गांगुली यांनी म्हटले. दरम्यान, २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर शमीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्या विश्वचषकात २४ बळी घेऊन तो स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता.