गारगोटी : गारगोटीची सुपुत्री सोनम मस्कर हिने 67 व्या राष्ट्रीय शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. तिने 10 मीटर रायफल शूटिंग मिक्स इव्हेंट प्रकारामध्ये रेल्वेचे प्रतिनिधीत्व करताना अर्जुन बबुताच्या साथीने रौप्य कामगिरी नोंदवली.
सोनमने यापूर्वी दिल्ली येथे ऑक्टोबर महिन्यात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय शुटिंग वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत 10 मी रायफल प्रकारात रौप्य पदकावर आपले नाव कोरले होते. तिच्या या आतापर्यंतच्या प्रवासात तिला आंतरराष्ट्रीय नेमबाज शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या राधिका बराले-हवालदार यांचे प्रशिक्षण लाभले. तर आई सुमन व वडील उत्तम मारुती मस्कर (रा. पुष्पनगर, ता. भुदरगड) यांचे प्रोत्साहन लाभले. सोनमचे वडील हे दुध वितरक आहेत. सध्या ते पुणे येथे वास्तव्यास आहेत.
सोनमच्या मोठ्या बहीणीने आर्किटेक्चरचे शिक्षण पूर्ण केले आहे, तर लहान भाऊ हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे. सोनमच्या वडीलांनी अत्यंत कष्टातून मोठ्या जिद्दीने सोनमला नेमबाज बनविले. सोनमच्या यशाने आपण आनंदी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.