T20 World Cup 2026 | कुणीतरी कपिलदेव बनण्याची गरज File Photo
स्पोर्ट्स

T20 World Cup 2026 | कुणीतरी कपिलदेव बनण्याची गरज

पुढारी वृत्तसेवा

निमिष पाटगावकर

1983 च्या विश्वचषकात भारताला उपांत्य फेरी गाठायला झिम्बाब्वेविरुद्धचा सामना जिंकणे अनिवार्य होते. आज 2026 च्या विश्वचषकातही हीच परिस्थिती आपल्यावर आलेली आहे. तेव्हा 5 बाद 17 वरून कपिलदेवने ती अजरामर खेळी करून सामना जिंकून दिला आणि पुढे विश्वचषकही. आज चेन्नईला आपला कपिलदेव कोण असेल? इशान किशन, सूर्या का हार्दिक पंड्या? उपांत्य फेरी गाठायला भारताला सुपर-8 मधील दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक आहे. आजचा आपला सामना सुरू होईपर्यंत द. आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्याचा निकाल हाती आला असेल. द.आफ्रिकेने आपली विजयी घोडदौड चालू ठेवली तर नेट रनरेटचा बागुलबुवा आपल्याला घाबरवणार नाही आणि आपल्याला फक्त दोन विजयच मिळवावे लागतील मग ते कितीही फरकाने असोत. असे झाले तर कोलकात्याचा आपला वेस्ट इंडिज विरुद्धचा सामना हा उपांत्य फेरीचा दावेदार ठरवणारा असेल.

या जर-तर च्या शक्यतेतून तात्पुरते बाहेर पडून आजच्या सामन्यावर लक्ष केंद्रित केले तर हा सामना मोठ्या फरकाने जिंकायला भारताला काय करावे लागेल याचा विचार करू या. चेन्नईला चेपॉकवर काळ्या मातीच्या खेळपट्टीवर खेळताना दोन्ही संघांचा पहिला कस लागेल तो इथल्या हवामानाशी जुळवून घेण्याचा. साधारण 27 ते 30 डिग्री सेल्सियस बरोबरच 80 टक्के आर्द्रता असलेल्या वातावरणात डिहायड्रेशनपासून बचाव करत दोन्ही संघांना खेळायचे आहे. या फलंदाजीला अनुकूल दिसणार्‍या खेळपट्टीवर भारताला सर्वात प्रथम गरज आहे ती उत्तम सलामीची. सराव सत्रात संजू सॅमसन आणि इशान किशन दोघे सराव करताना दिसले, पण नंतर अभिषेक शर्मानेही भारतीय गोलंदाज नाही तर सरावासाठी आलेल्या गोलंदाजांविरुद्ध सराव केला. रिंकू सिंगला वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे घरी जावे लागले होते. काल संध्याकाळी तो परतला असेल, पण सरावाशिवाय तो खेळेल का याची शंका आहे. रिंकू सिंगच्या ऐवजी संजू सॅमसनला संघात घेतले तर आतापर्यंत फसलेल्या सलामीला सुधारण्यासाठी अभिषेक शर्मा-संजू सॅमसन हा सलामीचा प्रयोग होऊ शकतो आणि तिसर्‍या क्रमांकावर इशान किशन येऊन तिलक वर्मा रिंकूच्या जागी खेळू शकतो. हे करण्यात एकच धोका आहे ते म्हणजे फॉर्मात असलेल्या इशान किशनची जागा बदलून त्याची लय बिघडण्याचा.

अभिषेक शर्माच्या बरोबर सलामीला संजू सॅमसन येवो अथवा इशान किशन. आपल्याला नितांत गरज आहे ती उत्तम सलामीची. कालच्या सराव सत्रात अभिषेक शर्मा, सितांशू कोटक आणि गौतम गंभीर यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. अभिषेक शर्माला आपल्या इमेजमधून बाहेर येऊन आज खेळावेच लागेल. कमीत कमी पहिला पॉवर प्ले टिकून राहण्याच्या द़ृष्टीने अंधाधुंद फटकेबाजीला आळा घालून त्याला मनोनिग्रह दाखवावा लागेल. आपल्याला सहसा दुसर्‍याची उदाहरणे दिलेली आवडत नाहीत, पण परवा पाकिस्तानविरुद्ध 2 बाद 17 असताना हॅरी ब्रुकने अशा परिस्थितीत कसे खेळायला पाहिजे याचा वस्तुपाठ घालून दिला. त्याचे 50 चेंडूंतील शतक दोनशेचा स्ट्राईक रेट दाखवून जाते, पण यात त्याने तब्बल 18 एकेरी आणि 9 दुहेरी धावा काढल्या. म्हणजे 50 पैकी 27 चेंडू त्याने एकेरी- दुहेरी धावा जोडत 36 धावा काढायला वापरले. एकदा जम बसला, परिस्थिती आटोक्यात आली आणि विकेटस् शिल्लक असल्या तर कधीही हल्लाबोल करून धावा जोडता येतात हे साधे तत्त्व आपल्या सलामीने पाळले तरी आपली फलंदाजी पुन्हा एकदा मजबूत दिसायला लागेल.

विश्वचषकाच्या संघाचा कर्णधार हे पद ओझे न वाटता सूर्यकुमार यादव मोकळेपणाने खेळात आहे ही सुखावह गोष्ट आहे. मुंबईची मैदाने, त्याचा पारसी जिमखाना क्लब आणि मुंबई संघ या मुशीतून तयार झालेल्या सूर्याचा या विश्वचषकात एक कर्णधार म्हणून कस लागत आहे. सलामी उत्तम मिळाली तर तो त्याची डाव उभारायची भूमिका बदलून मोठ्या स्कोअरचे लाँच पॅड होऊ शकतो. त्याला कशात सुधारणा करायची गरज असेल तर त्याचे गोलंदाजीचे पर्याय हाताळण्यात. या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरच्या जागी अक्षर पटेल येईल हे जवळपास नक्की आहे. अक्षर पटेलच्या विकेट टू विकेट मार्‍याने धावा रोखायला मदत होईलच, पण फलंदाजीलाही आधार मिळेल. बुमराह, अर्शदीप, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि पंड्या यांना लय मिळाली तर शिवम दुबेला गोलंदाजी करावी लागणार नाही. या विश्वचषकात शिवम दुबे ही आपली गोलंदाजीची वीक लिंक आहे, पण त्याच्या फलंदाजीच्या क्षमतेमुळे त्याचे अष्टपैलुत्व टिकून आहे. हार्दिक पंड्याने पहिल्या पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी केली तरी त्याची षटके डावाच्या सोळाव्या षटकापर्यंत संपवली पाहिजेत आणि अठरावे आणि विसावे षटक बुमराहनेच टाकणे गरजेचे आहे. आज खेळपट्टी बघून कुलदीपला खेळवायचा निर्णय घेतला जाईल.

झिम्बाब्वे या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेला नमवून इथंपर्यंत आले आहेत तेव्हा त्यांना कुणीच कमी समजणार नाही, पण त्यांच्या संघाची कामगिरी ही कर्णधार सिकंदर रझाच्या भोवती गुंफलेली आहे. सिकंदर रझाचा समाचार वेस्ट इंडिजने घेतल्यावर झिम्बाब्वे संघच बॅकफूटवर गेला. सलामीवीर मारुमानी आणि बेनेट उत्तम खेळत आहेत आणि गोलंदाजीत मुझरबानी, रझा आणि इव्हान्स त्यांना यश मिळवून देत आहेत. कागदावर बघितले तर भारतीय संघ बलाढ्यच वाटतो आणि तसा तो 1983 मध्येही होता, पण तेव्हा एका कपिलदेवची गरज लागली आणि आजही कुणाला तरी कपिलदेव बनून मोठा विजय मिळवून द्यायची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT