ग्लास्गो; वृत्तसंस्था : भारताच्या पॅरा-ॲथलीट्सनी पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात अभूतपूर्व कामगिरी करताना या एकाच इव्हेंटमध्ये १ सुवर्ण व १ रौप्य अशी सलग पदके जिंकली. सोमन राणाने अप्रतिम कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर शुभम जुयालने रौप्यपदक पटकावून देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. भारताने या एकाच क्रीडा प्रकारात पोडियमवर पहिले दोन क्रमांक पटकावत इतिहास रचला.
अंतिम फेरीत सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले. सोमन राणाने उत्कृष्ट ताळमेळ आणि ताकदीच्या जोरावर १३.४० मीटर अंतरावर गोळा फेकला. त्याची ही कामगिरी या मोसमातील सर्वोत्तम ठरली. प्रतिस्पर्धी खेळाडूंना त्याचे हे अंतर पार करता आले नाही.
सोमनला भारतीय संघातूनच शुभम जुयालने तगडी फाईट दिली. शुभमने १३.२८ मीटर अंतराची नोंद करत रौप्यपदक आपल्या नावावर केले. पॅरा-ॲथलेटिक्समध्ये ऐतिहासिक दुहेरी यश मिळाले असले, तरी मुख्य पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात भारताचे पदक थोडक्यात हुकले. आशियाई खेळांचा सुवर्णपदक विजेता भारताचा स्टार खेळाडू तजिंदरपाल सिंग तूर याने २०.२७ मीटर अंतराची नोंद केली; परंतु तगड्या स्पर्धेमुळे त्याला ५ व्या स्थानावर समाधान मानावे लागले.