सांगली : विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार, स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि संगीतकार, निर्माता पलाश मुच्छल यांचा विवाह सोहळा रविवारी सांगलीत समडोळी फाटा येथील मानधना फार्म हाऊस येथे होणार आहे. या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी झाली आहे. या सोहळ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडूंचे आगमन झाले आहे. या सोहळ्यास अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत.
स्मृती मानधनाच्या विवाह सोहळ्याची तयारी गेल्या तीन-चार दिवसापासून जोरात सुरू आहे. या विवाह सोहळ्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. या विवाहासाठी भारतीय संघातील स्मृतीच्या सहकारी खेळाडू चार दिवसापूर्वीच दाखल झाल्या आहेत. वर पलाश मुच्छलही दोन दिवसापूर्वीच सांगलीत आला आहे. शुक्रवारपासून मानधना फार्म हाऊसवर वेगवेगळे विधी पार पडत आहेत. हळदीचा कार्यक्रमही मोठ्या उत्साहात झाला. हळदीच्या निमित्ताने स्मृती, पलाश तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि भारतीय महिला संघातील खेळाडू नाचगाण्यात रंगून गेले होते. हळदी समारंभामध्ये सर्वांनी संगीताच्या तालावर थिरकत लग्नकार्याचा आनंद लुटला. रविवार, 23 नोव्हेंबररोजी निमंत्रितांच्या उपस्थितीत विवाह सोहळा होणार आहे. फक्त निमंत्रितांनाच विवाहस्थळी प्रवेश देण्यात येत आहे.