Smriti Mandhana
मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार व सलामीवीर स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा विवाह अखेर रद्द झाला आहे. दोघांनीही रविवारी आपापल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत, लग्न मोडल्याचे अधिकृत जाहीर केले. दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले असून जुन्या पोस्ट्स डिलीट केल्या आहेत. आता पलाशने स्मृतीला प्रपोज केलेला व्हिडिओ देखील डिलीट केल्याने त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
या दोघांचा विवाह गेल्या महिन्यात सांगलीतील तिच्या एसएम १८ या फार्म हाऊसवर २३ नोव्हेंबर रोजी सांगली येथे होणार होता. हळद, मेहंदी, संगीत हे कार्यक्रमही पार पडले होते; पण त्यानंतर स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने हा विवाह लांबणीवर टाकला होता. आता तर तो रद्दच झाला आहे. रविवारी अधिकृत घोषणा केल्यानंतर पलाश आणि स्मृतीने सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले.
डीवाय पाटील स्टेडियममध्ये पलाशने स्मृतीला प्रपोज करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. पलाशने या व्हिडीओसह वर्ल्ड कप सेलिब्रेशन क्लिप देखील काढून टाकली आहे. मात्र, स्मृतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट अजूनही त्याच्या अकाउंटवर आहे. या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये, नेटिझन्सनी पलाशला ट्रोल केले. त्याला सर्व पोस्ट, त्याचे इंस्टाग्राम अकाउंट देखील डिलीट करायला सांगत आहेत.
स्मृतीच्या अकाउंटवरही अनेक रोमँटिक पोस्ट्स होत्या, तिने एका पोस्टमध्ये पलाशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्या पोस्टमध्ये त्यांच्यातील आपुलकी आणि प्रेम स्पष्टपणे दिसत होते. स्मृतीने लिहिले होते, हॅपी बर्थडे माय बॉय. लग्न रद्द झाल्यानंतर स्मृतीने लग्नाच्या सर्व पोस्ट्स डिलीट केल्या आहेत.