भारतीय महिला संघाची स्टार सलामी फलंदाज स्मृती मानधनाने महिला वनडे विश्वचषक स्पर्धेत इतिहास घडवला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात तिने आपल्या खेळीतील २१ धावा पूर्ण करताच, भारताची माजी कर्णधार मिताली राजचा विक्रम मोडीत काढला.
महिला विश्वचषक अंतिम सामन्यात स्मृती मानधनाने ४५ धावा केल्या आणि महिला विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली. तिने २०१७ च्या विश्वचषकात ४०९ धावा काढणाऱ्या माजी कर्णधार मिताली राजला मागे टाकले. मानधनाने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत ४३४ धावा केल्या आहेत. तिने महिला विश्वचषक २०२५ मध्ये अप्रतिम फलंदाजी केली असून यात २ अर्धशतके आणि १ शतक झळकावले आहे. यादरम्यान स्मृतीने नऊ षटकार आणि ५० चौकार मारले आहेत. तिची सरासरी ५४.२५ इतकी राहिली आहे.
अंतिम सामन्यात स्मृतीला अर्धशतकाने हुलकावणी दिली. ती ४५ धावा करून बाद झाली. क्लो ट्रायॉनच्या चेंडूवर कट शॉट मारण्याचा प्रयत्न करताना ती यष्टीरक्षक सिनालाओ जाफ्ताकरवी झेलबाद झाली. स्मृतीने अंतिम सामन्यात शेफाली वर्मासोबत १०४ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे शेफालीसोबत एकूण १००० धावांचा टप्पाही गाठला. शेफाली अंतिम सामन्यात ८७ धावा करून बाद झाली.
दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड स्मृतीसमोर एक मोठे आव्हान उभे करते. ती या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे, तिने आठ सामन्यांमध्ये आठ डावांमध्ये ६७.१७ च्या सरासरीने आतापर्यंत ४७० धावा केल्या आहेत. तिने उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध १७० धावांची शानदार खेळी केली होती. तिने साखळी सामन्यात भारताविरुद्धही महत्त्वाची खेळी केली होती.