स्पोर्ट्स

Smriti Mandhana Team Indian captain : स्मृती मानधना भारतीय महिला क्रिकेट संघाची नवी कर्णधार; 'BCCI'ची अधिकृत घोषणा

भारतीय महिला क्रिकेटच्या नव्या पर्वाची सुरुवात, हरमनप्रीतनंतर आता स्मृती मानधनाचे युग

रणजित गायकवाड

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची धुरा धडाकेबाज फलंदाज स्मृती मानधना हिच्या खांद्यावर सोपवली आहे. बीसीसीआयने अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्मृती मानधनाच्या निवडीची घोषणा केली. गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय महिला क्रिकेटमधील आघाडीचा चेहरा राहिलेल्या स्मृतीने सर्वच क्रिकेट प्रकारांमध्ये संघाच्या यशात सातत्याने मोलाची भूमिका बजावली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदीर्घ अनुभवासोबतच देशांतर्गत आणि फ्रँचायझी क्रिकेटमध्येही तिने आपल्या नेतृत्वगुणांची चुणूक दाखवून दिली आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाचे यशस्वी नेतृत्व करत तिने २०२४ आणि २०२६ अशी दोनदा विजेतेपदे पटकावून दिली आहेत. २०१३ पासून भारतीय संघात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या स्मृतीच्या पाठीशी प्रचंड दांडगा अनुभव आहे. भारतीय महिला संघ आता एका नव्या टप्प्यात पदार्पण करत असताना, संघाने गेल्या काही वर्षांत मिळवलेल्या यशाची मालिका पुढे नेण्याची मोठी जबाबदारी आता स्मृतीवर असणार आहे. यापूर्वी स्मृतीने १८ आंतरराष्ट्रीय टी-२० आणि ४ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे तात्पुरते नेतृत्व केले असून, आता ती मर्यादित षटकांच्या (व्हाइट-बॉल) क्रिकेटमध्ये पूर्णवेळ नियमित कर्णधार म्हणून सूत्रे हाती घेईल.

कर्णधारपदी निवड झाल्यानंतर आनंद व्यक्त करताना स्मृती मानधना म्हणाली की, भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी मिळणे हा तिच्यासाठी अत्यंत विशेष आणि सर्वोच्च सन्मान आहे. देशाचे प्रतिनिधित्व करणे ही तिच्यासाठी नेहमीच अभिमानास्पद बाब राहिली असून, आता संपूर्ण संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे ही अत्यंत मोलाची गोष्ट आहे. या प्रवासात पाठिंबा देणारे बीसीसीआयचे पदाधिकारी, निवड समिती, सहकारी खेळाडू आणि हितचिंतक यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल तिने मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. यासोबतच माजी कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या योगदानाचा गौरव करताना स्मृती म्हणाली की, हरमनप्रीतने गेल्या अनेक वर्षांत अतिशय निष्ठेने आणि समर्पणाने संघाचे नेतृत्व केले असून ती या संपूर्ण प्रवासाचा अविभाज्य भाग राहिली आहे. हे पद स्वीकारताना त्यासोबत येणाऱ्या जबाबदारीची जाणीव असून, सहकाऱ्यांसोबत समन्वय साधून आणि सातत्याने शिकत भारतीय क्रिकेटला यशाच्या नव्या शिखरावर नेण्यासाठी सर्वतोपरी योगदान देण्याचा निर्धार तिने व्यक्त केला.

बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मणहास यांनी स्मृतीचे अभिनंदन करताना म्हटले की, स्मृती गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय क्रिकेटचा भक्कम आधारस्तंभ राहिली असून तिने सातत्याने आघाडीवर राहून नेतृत्व करण्याचे गुण सिद्ध केले आहेत. तिचा अनुभव आणि खेळाची सखोल समज ही नव्या जबाबदारीत अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल. बीसीसीआयचा स्मृतीवर पूर्ण विश्वास असून, आपल्या कारकिर्दीत दाखवलेली कटिबद्धता आणि व्यावसायिकता ती कर्णधार म्हणूनही नक्कीच सिद्ध करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त करत स्मृतीला तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बीसीसीआयचे मानद सचिव देवाजित सैकिया यांनीही स्मृतीचे कौतुक केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे गांभीर्य ती उत्तम रितीने जाणते आणि हाच दृष्टिकोन ती तिच्या नेतृत्वातही आणेल, असे सैकिया यांनी नमूद केले. भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणे ही मोठी जबाबदारी असली तरी ती लीलया पेलण्याचा अनुभव आणि शांत संयमी स्वभाव स्मृतीकडे आहे. डब्ल्यूपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मिळवून दिलेले जेतेपद हे तिच्या उत्कृष्ट नेतृत्व क्षमतेची साक्ष देते. स्मृतीच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघ सातत्याने प्रगती करत राहील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी स्मृती आणि संपूर्ण भारतीय संघाला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT