पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाचा अनुभवी ऑफ-स्पिन गोलंदाज नॅथन लायनने (Nathan Lyon) श्रीलंकेविरुद्ध गॅले स्टेडियमवर खेळल्या जात असणाऱ्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दिनेश चांदीमलची विकेट घेत त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 550 बळी पूर्ण केले. कसोटी क्रिकेटमध्ये हा आकडा गाठणारा नॅथन लायन आता 7 वा गोलंदाज ठरला आहे.
दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियन संघाने विजयाकडे पावले टाकली. त्या आधी श्रीलंकेच्या संघाने त्यांच्या दुसऱ्या डावात 8 विकेट गमावून 211 धावा केल्या. ज्यामुळे त्यांच्या खात्यात फक्त 54 धावांची आघाडी जमा झाली.
लायनच्या आधी, ऑस्ट्रेलियाच्या फक्त दोन गोलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये 550 किंवा त्याहून अधिक बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. यामध्ये दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्न आणि वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा यांच्या नावाचा समावेश आहे. वॉर्नने 708 तर मॅकग्राने 563 बळी घेतले. आता लायनचा या पंक्तीत बाबतीत समावेश झाला आहे. त्याच्या नावावर 552 बळी जमा झाले आहेत, जे आणखी वाढण्याची खात्री आहे.
136 व्या कसोटीत लायनने 550 बळी पूर्ण केले. लायनने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 24 वेळा एका डावात 5 विकेट्स घेण्यास यश मिळवले आहे. सध्या सक्रिय खेळाडूंमध्ये नॅथन लायन हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे.
मुथय्या मुरलीधरन : 800 विकेट्स
शेन वॉर्न : 708 विकेट्स
जेम्स अँडरसन : 704 विकेट्स
अनिल कुंबळे : 619 विकेट्स
स्टुअर्ट ब्रॉड : 604 विकेट्स
ग्लेन मॅकग्रा : 563 विकेट्स
नाथन लायन : आतापर्यंत 552 बळी
आतापर्यंत 552 कसोटी बळी घेणाऱ्या नॅथन लायनला आता लवकरच सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत त्याच्याच देशाच्या ग्लेन मॅकग्राला मागे टाकण्याची संधी आहे. मॅकग्राने एकूण 563 कसोटी बळी घेतले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी ऑफ-स्पिन गोलंदाज मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे, ज्याने एकूण 800 विकेट्स घेतल्या आहेत.