Thailand Open Badminton Tournament | सिंधू, लक्ष्य, सात्त्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत 
स्पोर्ट्स

Thailand Open Badminton Tournament | सिंधू, लक्ष्य, सात्त्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत

पुढारी वृत्तसेवा

बँकॉक; वृत्तसंस्था : अव्वल मानांकित सात्त्विकसाईराज रणकिरेड्डी-चिराग शेट्टी, पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी आपला शानदार फॉर्म कायम राखत थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली. याचवेळी के. श्रीकांत आणि देविका सिहागला मात्र दुसर्‍या फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले.

पुरुष दुहेरीत अव्वल मानांकित सात्त्विक आणि चिराग या जोडीने मलेशियाच्या जेरेमी आणि हैकल मोहम्मद जोडीचा पराभव केला. अवघ्या 44 मिनिटांत हा सामना जिंकत त्यांनी अंतिम आठमध्ये स्थान मिळवले. आता उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना जपानच्या ताकुमी नोमुरा आणि युइची शिमोगामी या सहाव्या मानांकित जोडीशी होईल.

सिंधूचे एकतर्फी वर्चस्व

महिला एकेरीत सिंधूने डेन्मार्कच्या अमाली शुल्झचा अवघ्या 28 मिनिटांत सहज पराभव केला. सिंधूने दोन्ही गेममध्ये सलग 7 गुण घेत शुल्झवर दडपण आणले. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूसमोर जपानच्या तिसर्‍या स्थानावर असलेल्या अकाने यामागुचीचे तगडे आव्हान असेल.

पुरुष एकेरीत सातव्या मानांकित लक्ष्य सेनने चीनच्या झू झुआन चेनचा सरळ गेममध्ये धुव्वा उडवला. संपूर्ण सामन्यात लक्ष्यने आपल्या आक्रमक स्मॅशच्या जोरावर चेनला पुनरागमन करण्याची एकही संधी दिली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT