हरारे; वृत्तसंस्था : झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझाने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सामनावीर पुरस्कारांच्या बाबतीत विराट कोहलीला मागे टाकत एक नवीन विक्रम केला. रझाने हा पराक्रम हरारे येथे श्रीलंकेविरुद्धच्या दुसर्या टी-20 सामन्यात केला.
रझाने आपल्या उत्कृष्ट कामगिरीत चार षटकांत 11 धावा देत 3 बळी घेतले आणि यामुळे झिम्बाब्वेने 5 गडी राखून सहज विजय संपादन केला. 39 वर्षीय रझाचा हा टी-20 सामन्यांमधील 17 वा ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार आहे. यामुळे तो पूर्ण-सदस्य देशांमधील खेळाडूंमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला. यापूर्वी 2010 ते 2024 या काळात 125 टी-20 सामन्यांमध्ये विराटने 16 वेळा तर टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादवने देखील 83 टी-20 सामन्यांमध्ये 16 वेळा सामनावीर पुरस्कार मिळवले आहेत. एकूण टी-20 क्रमवारीत, मलेशियाचा वीरदीप सिंग 102 सामन्यांमध्ये 22 सामनावीर पुरस्कारांसह आघाडीवर आहे.
वीरदीप सिंग मलेशिया 22
सिकंदर रझा झिम्बाब्वे 17
विराट कोहली भारत 16
सूर्यकुमार यादव भारत 16
मोहम्मद नबी अफगाण 14
रोहित शर्मा भारत 14