Shubman Gill India vs England Test file photo
स्पोर्ट्स

Shubman Gill : शुभमन गिल विराट कोहलीची कॉपी करतोय; भारताच्या माजी क्रिकेटपटूचा आरोप

India vs England Test : लॉर्ड्स कसोटीत शुभमन गिल इंग्लंडच्या फलंदाजांवर आक्रमकतेने तुटून पडला होता, पण भारताला पराभव पत्करावा लागला, यावरून आता गिलवर माजी क्रिकेटपटूने मोठा आरोप केला आहे.

मोहन कारंडे

Shubman Gill India vs England Test

दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिल आपल्या आक्रमक शैलीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी यांनी गिलवर मोठा आरोप केला आहे. त्यांच्या मते, गिल कर्णधार म्हणून विराट कोहलीची नक्कल करण्याचा प्रयत्न करत असून, या अनावश्यक आक्रमकतेचा त्याच्या फलंदाजीवर नकारात्मक परिणाम होत आहे. लॉर्ड्स कसोटीदरम्यान इंग्लंडच्या खेळाडूंशी झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर तिवारी यांनी हे परखड मत व्यक्त केले आहे.

लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचे सलामीवीर झॅक क्रॉली आणि बेन डकेट यांच्यावर वेळकाढूपणाचा आरोप करत गिलने वाद निर्माण केला होता. मात्र, या शाब्दिक चकमकीत इंग्लंडने बाजी मारली आणि कसोटी जिंकून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. याच सामन्यात गिल फलंदाजीतही अपयशी ठरला आणि दोन्ही डावांत मिळून केवळ २२ धावा (१६ आणि ६) करू शकला. तिवारी यांच्या मते, ही आक्रमकता गिलच्या फलंदाजीवरही परिणाम करत आहे आणि ही शैली त्याला शोभणारी नाही.

विराट कोहलीने पूर्वी जे केले त्याची नक्कल

"कर्णधार म्हणून गिल ज्याप्रकारे वागत आहे, ते मला आवडत नाही. तो विराट कोहलीने पूर्वी जे केले त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्याचा त्याच्या फलंदाजीवर वाईट परिणाम होत आहे," असं तिवारी यांनी म्हटले आहे. आयपीएलमध्ये कर्णधार झाल्यापासून मी पाहिलं आहे की गिल सतत आक्रमक मनःस्थितीत असतो, पंचांशीही वाद घालतो. ही गिलसाठी सामान्य गोष्ट नाही. त्याला काही सिद्ध करण्याची गरज नाही. कर्णधाराने आघाडी घ्यावी हे बरोबर, पण इतकी आक्रमकता आवश्यक नाही. यामुळे त्याची उर्जा वाया जाते. हे वर्तन गिलच्या मूळ स्वभावाच्या विरुद्ध आहे." असेही ते म्हणाले.

शब्दांतून नाही, कृतीतून आक्रमकता दाखवा

तिवारी म्हणाले की, आक्रमकता दाखवायची असेल तर ती बोलण्यातून नव्हे, तर कामगिरीतून दाखवावी. गिलने आपल्या शैलीनुसार आक्रमक राहावं, पण त्यासाठी प्रत्येक वेळी शब्दांनी उत्तर देण्याची गरज नाही. कसोटी सामने जिंकूनही आक्रमकता दाखवता येते. भारताने ही मालिका २-१ अशी आघाडी घेऊ शकली असती. भारतीय संघाचा कर्णधार म्हणून अशी आक्रमकता योग्य नाही,असे तिवारी म्हणाले.

स्टंपजवळ ऑडिओमध्ये जे शब्द ऐकू येत आहेत, त्यावर मी समाधानी नाही. आपण भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करत आहात. आधीच्या काही कर्णधारांनीही अशी भाषा वापरली असेल, पण आता हे नियंत्रणात आणायला हवं. तुम्ही जर अश्लील भाषेचा वापर केला, तर पुढची पिढीही तेच शिकेल, असा सल्लाही तिवारी यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT