राजकोट : न्यूझीलंडविरुद्ध वन-डे मालिकेतील पराभवानंतर भारतीय कसोटी आणि वन-डे संघाचा कर्णधार शुभमन गिलने विश्रांती न घेण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबच्या रणजी संघाला बळकटी देण्यासाठी तो गुरुवारपासून राजकोट येथे सौराष्ट्रविरुद्ध होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यात खेळणार आहे.
नुकत्याच संपलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे मालिकेत भारताचा 1-2 असा पराभव झाला. या मालिकेतील तिन्ही सामन्यांत खेळल्यानंतर 26 वर्षीय शुभमनने थेट लाल चेंडूच्या क्रिकेटकडे वळण्याचा निर्णय घेतला. शुभमन आगामी टी-20 विश्वचषक संघात नसल्याने, प्रथमश्रेणी स्तरावर पंजाबच्या बाद फेरीच्या आशा जिवंत ठेवण्याच्या मोहिमेत आता हिरीरीने सहभागी होऊ शकेल.
पंजाबचा संघ सध्या ‘ब’ गटात पाच सामन्यांत 11 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. माजी विजेत्या पंजाबला बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी उर्वरित तिन्ही साखळी सामन्यांत निर्भेळ विजय मिळवणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत सलामीला शुभमनची हजेरी संघासाठी विशेष महत्त्वाची ठरू शकते.
सौराष्ट्रसारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्याविरुद्धचा हा सामना शुभमनसाठी वैयक्तिकरीत्याही महत्त्वाचा आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान झालेल्या मानेच्या दुखापतीनंतरचा हा त्याचा पहिलाच प्रथम श्रेणी सामना असेल. या दुखापतीमुळे तो प्रदीर्घ काळ क्रिकेटपासून दूर होता.
इंदूर ते राजकोट अशी थेट विमानसेवा उपलब्ध नसल्यामुळे, शुभमन गिलला तब्बल आठ तासांचा बसचा प्रवास करावा लागला. या दीर्घ बस प्रवासानंतर शुभमन गिल राजकोटला पोहोचला. पूर्वनियोजित रूपरेषेनुसार पंजाब-सौराष्ट्र यांच्यातील रणजी लढत बुधवार (दि. 21) पासून खेळवली जाईल.