झिम्बाब्वेविरुद्ध तिसर्‍या टी-20 सामन्यात 23 धावांनी विजय  BCCI 'X' Handle
स्पोर्ट्स

शुभमन गिल-ऋतुराज चमकले, भारताची मालिकेत आघाडी

झिम्बाब्वेविरुद्ध तिसर्‍या टी-20 सामन्यात 23 धावांनी विजय

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : शुभमन-ऋतुराज यांची दमदार फलंदाजी व वॉशिंग्टन, आवेश यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर भारताने येथील तिसर्‍या टी-20 लढतीत यजमान झिम्बाब्वेचा 23 धावांनी फडशा पाडला आणि 5 सामन्यांच्या या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. गिलने 49 चेंडूंत 66, जैस्वालने 27 चेंडूंत 36 तर गायकवाडने अवघ्या 28 चेंडूंत 49 धावा झोडपल्यानंतर भारताने निर्धारित 20 षटकांत 4 बाद 182 धावा केल्या तर प्रत्युत्तरात झिम्बाब्वेला 20 षटकात 6 बाद 159 धावांवर समाधान मानावे लागले. वॉशिंग्टन सुंदरने 3 तर अवेश खानने 2 बळी घेतले.

विजयासाठी 183 धावांचे आव्हान असताना झिम्बाब्वेचा संघ एकदाही विजयाच्या ट्रॅकवर दिसून आला नाही. डायन मेयर्सने 49 चेंडूंत नाबाद 65 धावा केल्या. मात्र, त्याची ही खेळी एकाकी ठरली. रवींद्र जडेजाच्या निवृत्तीनंतर टी-20 संघासाठी महत्त्वाचा भाग ठरू शकेल, अशी शक्यता असलेल्या वॉशिंग्टन सुंदरने या लढतीत 3 बळी घेतले तर आवेश खाननेही झिम्बाब्वेला लागोपाठ झटके देताना डावाला खिंडार पाडले. या मालिकेतील चौथा सामना आता शनिवारी (दि. 13) खेळला जाणार आहे.

बुधवारी येथील हरारे स्पोर्टस् क्लबमध्ये टीम इंडियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 20 षटकांत 4 गडी गमावून 182 धावा केल्या. शुभमन गिल (66) आणि यशस्वी जैस्वाल (36) या सलामीच्या जोडीने 67 धावांची भागीदारी केली. यानंतर कर्णधार गिलला ऋतुराज गायकवाडची (49) चांगली साथ लाभली. या जोडीने तिसर्‍या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली आणि संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले.

गिलचे दुसरे अर्धशतक

मालिकेतील पहिल्या दोन टी-20 सामन्यांमध्ये फलंदाजीत छाप पाडण्यात अपयशी ठरलेला गिल तिसर्‍या सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. त्याने आणि जैस्वालच्या साथीने पॉवर प्ले ओव्हर्समध्ये 55 धावा जोडल्या. एका टोकाकडून दमदार फलंदाजी करणार्‍या गिलने 36 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. 49 चेंडूंत 66 धावांची खेळी खेळल्यानंतर तो बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 3 षटकार मारले.

संक्षिप्त धावफलक

भारत : 20 षटकांत 4 बाद 182 धावा. (शुभमन गिल 66, ऋतुराज गायकवाड 49. सिकंदर रझा 2/24, ब्लेसिंग मुझरबानी 2/25.)

झिम्बाब्वे : 20 षटकांत 6 बाद 159 धावा. (डिओन मेयर्स नाबाद 65, क्लाईव्ह मदंडे 37. वॉशिंग्टन सुंदर 3/15, आवेश खान 2/39.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT