India vs England Test 2025 Shubman Gill praised Siraj-Akash Deep
बर्मिंगहॅम : भारतीय कर्णधार शुभमन गिलने बर्मिंगहॅमच्या एजबस्टन टेस्टमध्ये ऐतिहासिक विजयानंतर मोहम्मद सिराज आणि आकाश दीपच्या जोरदार कामगिरीचे कौतुक केले आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत या दोघांनी मिळून एकूण १७ बळी घेतले. गिलने सांगितलं की त्यांच्या कामगिरीमुळे कर्णधार म्हणून त्याच काम खूपच सोपं झालं. भारताने दुसऱ्या टेस्टमध्ये ३३६ धावांनी दणदणीत विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
आकाश दीपने या सामन्यात एकूण १० बळी घेतले, ज्यात दुसऱ्या डावात त्याने कारकिर्दीतील पहिल्यांदाच पाच बळी घेतले. सिराजने दोन्ही डाव मिळून ७ बळी घेतले. सामन्यानंतर चेतेश्वर पुजारासोबत संवाद साधताना गिल म्हणाला, “जेव्हा तुमचे दोन वेगवान गोलंदाज १७ विकेट घेतात, तेव्हा कर्णधारासाठी गोष्टी खूपच सोप्या होतात. बुमराह या सामन्यात नव्हते, पण आपल्या संघात असे गोलंदाज आहेत जे एका सामन्यात २० बळी घेऊ शकतात.”
पहिल्या टेस्टमध्ये झालेल्या पराभवानंतर गिलने या शानदार पुनरागमनाचे श्रेय उत्कृष्ट गोलंदाजी आणि अचूक क्षेत्ररक्षणाला दिलं. गिल म्हणाला, “असं अनेक वेळा झालं आहे की आपण मालिकेतील पहिला सामना हरलो आणि नंतर जोरदार पुनरागमन केलं. त्यामुळे आम्हाला माहीत होतं की कसं परत यायचं. जर आपण सातत्यानं ४५० धावा केल्या, तर आपल्या गोलंदाजांकडे सामना वळवण्याची ताकद आहे.”
गिल पुढे म्हणाला, “माझ्या मते ज्या प्रकारे आपण गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात पुनरागमन केलं, ते खरोखर विशेष होतं.” या विजयाच्या पायाभरणीमध्ये गिलचं योगदान महत्त्वाचं होतं. त्याने पहिल्या डावात २६९ आणि दुसऱ्या डावात १६१ धावा करत भारताच्या एकूण ६०८ धावांचा डोंगर उभा केला. गिल म्हणाला, “अशा खेळपट्टीवर आम्हाला माहिती होतं की जर आपण ४००-५०० धावा केल्या, तर त्या पुरेशा ठरतील. प्रत्येक सामना हेडिंग्ले सारखा नसतो. आपल्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली.” गिलने प्रसिद्ध कृष्णाचंही कौतुक केलं, त्याने फारसे बळी न घेताही दबाव कायम ठेवला. “आकाश दीपने अचूक लेंथवर मारा केला, जे अशा पिचवर खूप अवघड होतं. त्याने आमच्यासाठी जबरदस्त खेळी केली. मी माझ्या खेळासोबत निश्चितच सध्या खूप कम्फर्टेबल आहे,” असं गिल म्हणाला.
गिलने पुढे असंही स्पष्ट केलं की, “जर माझ्या योगदानामुळे आपण ही मालिका जिंकू शकलो, तर त्यापेक्षा मोठं काही नाही. मी एक फलंदाज म्हणून खेळू इच्छितो, तसंच निर्णयही फलंदाज म्हणून घ्यायचे असतात. कधी कधी कर्णधार म्हणून आपण काही धोके घेत नाही, जे फलंदाज म्हणून घ्यावे लागतात.” शेवटी गिलने सांगितलं की, बुमराह लॉर्ड्समध्ये होणाऱ्या तिसऱ्या टेस्टसाठी सज्ज असतील. दुसरीकडे, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने सामन्यात संधी गमावल्याचं दु:ख व्यक्त केलं. तो म्हणाला, “जेव्हा भारत ५ बाद २०० वर होता, तेव्हा आम्ही खूप खूश होतो, पण त्यांना लवकर बाद करू शकलो नाही, हीच चूक झाली.”