स्पोर्ट्स

Shubhman Gill Record : भारतीय कर्णधार गिल इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर; 19 वर्षे जुना विक्रम मोडण्याची मोठी संधी

Shubhman Gill Record : कर्णधार गिलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. त्याला केवळ 25 धावांची आवश्यकता आहे.

रणजित गायकवाड

इंग्लंडविरुद्धच्या सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत तीन सामन्यांत 600 हून अधिक धावा केल्या आहेत. दोन्ही संघांमधील मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळवला जाणार असून, या सामन्यात भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. इंग्लंडविरुद्ध एकाच कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा आशियाई फलंदाज होण्यासाठी त्याला मँचेस्टर कसोटीत केवळ 25 धावांची आवश्यकता आहे.

मँचेस्टरमध्ये गिल रचणार इतिहास

इंग्लंडविरुद्धच्या द्विपक्षीय कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आशियाई फलंदाजांमध्ये पाकिस्तानचे माजी फलंदाज मोहम्मद युसूफ यांच्या नावावर आहे. त्यांनी 2006 साली इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 631 धावा केल्या होत्या. दुसरीकडे, गिलने सध्या सुरू असलेल्या मालिकेत तीन सामन्यांच्या 6 डावांमध्ये 607 धावा केल्या आहेत. युसूफचा हा विक्रम मोडण्यासाठी त्याला चौथ्या कसोटी सामन्यात केवळ 25 धावांची गरज आहे. या मालिकेत गिलने आतापर्यंत एक द्विशतक आणि दोन शतके झळकावली असून, त्याची सर्वोच्च धावसंख्या 269 आहे. जर त्याने चौथ्या कसोटीत २५ धावा केल्या, तर तो मोहम्मद युसूफचा 19 वर्षे जुना विक्रम आपल्या नावे करेल.

जैस्वालचा विक्रम मोडण्याचीही संधी

या सामन्यात शुभमन गिलला आणखी काही विक्रम आपल्या नावे करण्याची संधी असेल. मँचेस्टर कसोटी सामन्यात गिलने 146 धावा केल्यास, तो भारत आणि इंग्लंड यांच्यातील एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल. हा विक्रम सध्या इंग्लंडचे माजी दिग्गज फलंदाज ग्रॅहम गूच यांच्या नावावर आहे. त्यांनी 1990 साली एका मालिकेत 752 धावा केल्या होत्या.

यासोबतच, इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनण्याची संधीही गिलकडे आहे. त्याला भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालला मागे टाकण्याची संधी आहे. 2024 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत जैस्वालने 712 धावा केल्या होत्या. जैस्वालला मागे टाकण्यासाठी गिलला 106 धावांची आवश्यकता आहे. आता इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी सामन्यात गिल किती विक्रम आपल्या नावे करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT