Shubman Gill Injury
कोलकाता: येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्वीप शॉट मारल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिलला मानेला दुखापत झाली आहे. सामन्यात त्याच्या सहभागाबाबत बीसीसीआय निर्णय घेणार आहे.
३५ व्या षटकात वॉशिंग्टन सुंदर बाद झाल्यानंतर गिल फलंदाजीला आला. आक्रमक स्वीप शॉट मारत चौकार मारला. त्यानंतर लगेचच तो मान दुखत असल्याचे दिसून आले आणि त्याला रिटायर हर्ट करावे लागले. शुभमन गिलला मानेला दुखापत झाली आहे आणि बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून त्याच्यावर लक्ष ठेवले जात आहे. आता या सामन्यात शुभमन खेळणार का, हे त्याच्या मानेच्या दुखापतीमध्ये कशी सुधारणा होईलवर यावरच ठरेल, असे बीसीसीआयच्या निवेदनात म्हटले आहे.
पहिल्या दिवसाचा शेवट भारताच्या १/३७ धावांवर झाला. यशस्वी जयस्वालने मार्को जानसेनच्या गोलंदाजीवर चेंडू ड्रॅग करून बाद झाला.दुसऱ्या दिवशी, केएल राहुल आणि भारताचा नवा क्रमांक ३ वॉशिंग्टन सुंदर यांनी दक्षिण आफ्रिकेची आघाडी हिरावून घेतली आणि ५७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. हिच भारताची डावातील सर्वात मोठी भागीदारी होती. तथापि, दक्षिण आफ्रिकेने लवकरच पुन्हा नियंत्रण मिळवले, सायमन हार्मरने तीन महत्त्वपूर्ण विकेट्स घेत आघाडी घेतली.ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु यजमान संघ १८९ धावांवर आटोपल्याने भारताला फक्त ३० धावांची आघाडी मिळवता आली.
भारतानं पहिल्या डावात ३० धावांची आघाडी घेतल्यानंतर दक्षिण अफ्रिकेनं आपला दुसरा डाव सुरू केला. मात्र रविंद्र जडेजाच्या भेदक माऱ्यासमोर अफ्रिकेच्या फलंदाजांनी एका पाठोपाठ एक लोटांगण घालणं सुरू केलं. जडेजानं चार धक्के दिल्यानं दिवस अखेर अफ्रिकेची अवस्था ७ बाद ९३ धावा अशी झाली आहे. रविंद्र जडेजानं आतापर्यंत ४ तर कुलदीप यादवनं २ आणि अक्षर पटेलनं १ विकेट घेतली. टेम्बा बाऊमा २९ धावा करून एकाकी झुंज देत आहे.