भारताचा कसोटी कर्णधार म्हणून शुभमन गिलने इंग्लंडच्या धर्तीवर धमाका केला आहे. लीड्स येथे कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच डावात शतक झळकावल्यानंतर, त्याने बर्मिंगहॅममध्ये इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, गुरुवारी (३ जून) रोजी द्विशतक ठोकले. 25 वर्षीय शुभमनने कर्णधार म्हणून आपल्या तिसऱ्याच डावात द्विशतक झळकावून इतिहास रचला आहे. इंग्लंडमध्ये द्विशतक झळकावणारा गिल हा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे. याशिवाय, त्याने दिग्गज सुनील गावस्कर आणि राहुल द्रविड यांच्या पंक्तीत स्थान मिळवले. इंग्लंडमध्ये द्विशतक झळकावणारा शुभमन गिल हा भारताचा तिसरा खेळाडू ठरला.
गिल केवळ इंग्लंडमध्येच नव्हे, तर SENA देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून द्विशतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी, 192 धावांसह मोहम्मद अझरुद्दीन या यादीत अव्वल स्थानी होते. त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध ऑकलंड येथे हा पराक्रम केला होता. याशिवाय, इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात 200 किंवा त्याहून अधिक धावांची खेळी करणारे गिल हा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.
गिलपूर्वी, सुनील गावस्कर यांनी 1979 मध्ये आणि राहुल द्रविड यांनी 2002 मध्ये हा पराक्रम केला होता. त्यामुळे, तब्बल 23 वर्षांनंतर एका भारतीय खेळाडूने इंग्लंडमध्ये द्विशतक झळकावले आहे. द्रविडने 2002 मध्ये 217 धावांची खेळी केली होती, तर 1979 मध्ये गावस्कर यांनी 221 धावांची खेळी साकारली होती. गिलच्या कसोटी कारकिर्दीतील हे पहिलेच द्विशतक आहे.
गिल SENA देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) द्विशतक झळकावणारा पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे. यापूर्वी श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानच्या नावे सर्वोत्तम धावसंख्या होती. त्यांनी 2011 मध्ये लॉर्ड्स येथे 193 धावांची खेळी केली होती.
गिलने 311 चेंडूत द्विशतक पूर्ण केले. त्याने यशस्वी जैस्वालसोबत तिसऱ्या विकेटसाठी 67, ऋषभ पंतसोबत चौथ्या विकेटसाठी 47 तर त्याने रवींद्र जडेजासोबत सहाव्या विकेटसाठी 203 धावांची भागीदारी केली. त्यानंतर त्याने वॉशिंग्टन सुंदरसोबतही उत्तम भागीदारी केली. त्याच्या खेळीमुळे भारत 500 धावांच्या जवळ पोहोचला.