मँचेस्टर : केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी संयमी खेळी करत 130 धावांची भागीदारी केली. केएल राहुलने आपले अर्धशतक पूर्ण करून कर्णधार शुभमन गिलच्या पावलावर पाऊल ठेवले. भारताने 44 षटकांत 2 बाद 130 धावा केल्या आहेत आणि इंग्लंडपेक्षा 181 धावांनी पिछाडीवर आहे. यशस्वी जयस्वाल आणि बी साई सुधरसन पहिल्याच षटकात शून्य धावांवर बाद झाल्याने भारताची धावसंख्या ०/२ झाली होती.
तपुर्वी, कर्णधार बेन स्टोक्सच्या दोन वर्षांतील पहिल्या दमदार शतकाच्या जोरावर इंग्लंडने चौथ्या कसोटी सामन्यात भारतासमोर पहिल्या डावात धावांचा डोंगर उभा केला. चौथ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 669 धावांवर संपुष्टात आला आणि त्यांनी भारतावर 311 धावांची भक्कम आघाडी मिळवली. या महाकाय धावसंख्येला प्रत्युत्तर देताना भारताची दुसर्या डावात 2 बाद 86 अशी स्थिती होती. शुभमन गिल 52 तर केएल राहुल 32 धावांवर खेळत होते.
शनिवारी खेळाला सुरुवात झाली तेव्हा इंग्लंड 544/7 अशा स्थितीत होता आणि स्टोक्स 77 धावांवर खेळत होता. सुरुवातीला थोडा नर्व्हस दिसणार्या स्टोक्सने लवकरच आपला जम बसवला आणि दोन वर्षांचा शतकाचा दुष्काळ संपवला. शतक पूर्ण झाल्यावर त्याने आकाशाकडे पाहत आपल्या दिवंगत वडिलांना आदरांजली वाहिली. या खेळीदरम्यान स्टोक्सने अनेक विक्रम आपल्या नावे केले.
एकाच कसोटी सामन्यात शतक आणि पाच बळी घेणारा तो इंग्लंडचा चौथा खेळाडू ठरला. याशिवाय, कर्णधार म्हणून अशी कामगिरी करणारा तो पहिलाच इंग्लिश खेळाडू आहे. या खेळीदरम्यान त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 7,000 धावांचा टप्पाही ओलांडला. स्टोक्सने या डावात 141 धावांची शानदार खेळी केली. त्याला ब्रायडन कार्सने 47 धावांची उपयुक्त साथ दिली. अखेर इंग्लंडचा संपूर्ण संघ 669 धावांवर बाद झाला.