Shreyas Iyer Leave Captaincy :
भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर सध्या भारतीय अ संघाचं नेतृत्व करत होता. मात्र ऑस्ट्रेलिया अ विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वीच त्यानं आपलं कर्णधार पद सोडलं असून तो संघातून देखील बाहेर पडला आहे. हा दुसरा सामना लखनौ इथं आजपासून सुरू होणार आहे. दरम्यान, श्रेयस अय्यरनं अचानक कर्णधारपद आणि संघ सोडण्याचं कारण अजून समजलेलं नाही. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यानं वैयक्तिक कारणामुळं संघ सोडला असल्याचं कळतंय.
दरम्यान, ध्रुव जुरेल श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत कर्णधारपद भूषवणार आहे. तो पहिल्या सामन्यात उपकर्णधार होता. अय्यरच्या जागेवर भारतीय अ संघात अजून कोणाची निवड झालेली नाही.
याबाबत सूत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाला माहिती दिली, 'होय श्रेयस अय्यर ब्रेक घेतोय तो मुंबईत परतला आहे. त्यानं निवडसमितीला याबाबत कळवलं आहे की तो दुसरा कसोटी सामना खेळू शकणार नाही. असं असलं तरी तो वेस्ट इंडीज विरूद्धच्या मालिकेसाठी निवडसमितीसाठी उपलब्ध असणार आहे.'
ऑस्ट्रेलिया अ विरूद्धच्या पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यरला फलंदाज म्हणून फारशी चकमदार कामगिरी करता आलेली नाही. त्याला १३ चेंडूत फक्त ८ धावा करता आल्या. वेस्ट झोनकडून खेळणाऱ्या अय्यरला दुलीप ट्रॉफीमध्ये देखील फारशी चमक दाखवता आली नाही. सेंट्रल झोनविरूद्धच्या सेमी फायनल सामन्यात त्याला २५ आणि १२ धावाच करता आल्या.
असं असलं तरी आगामी वेस्ट इंडीज विरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी अय्यरचं मधल्या फळीतील फलंदाज म्हणून नाव चर्चेत आहे. ही मालिका २ ऑक्टोबरपासून भारतात सुरू होत आहे. पहिला सामना हा नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.