पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2025 दरम्यान पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरला आयसीसीचा मोठा पुरस्कार मिळू शकतो. टीम इंडियाच्या मधल्या फळीतील या फलंदाजाला मार्च महिन्यातील आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. पुरस्काराच्या शर्यतीत अय्यर समोर न्यूझीलंडच्या रचिन रविंद्र आणि जेकब डफी या दोन खेळाडूंचे आव्हान असेल.
श्रेयस अय्यरने गेल्या महिन्यात ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मोहिमेदरम्यान भारताच्या मधल्या फळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या उजव्या हाताच्या फलंदाजाने मार्च महिन्यात तीन वनडे सामने खेळले आणि 57.33च्या सरासरीने तसेच 77.47च्या स्ट्राइक रेट एकूण 172 धावा फटकावल्या. तो या स्पर्धेदरम्यान भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून देण्यात अय्यरचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले. याच कारणामुळे त्याला ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.
अय्यर व्यतिरिक्त, किवी संघाचा सलामीवीर रचिन रवींद्रनेही चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. मार्च महिन्यात त्याने तीन सामन्यांमध्ये 151 धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी 50.33 राहिली. तर स्ट्राईक रेटही 106च्या वर होता. रचिनने गोलंदाजीतही प्रभावी मारा केला. त्याने तीन विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात रचिनने 108 धावांची शानदार खेळी केली. त्याने केन विल्यमसनसोबत 164 धावांची भागीदारी केली. याच कारणास्तव, न्यूझीलंड संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वोच्च धावसंख्या करण्यात यशस्वी झाला.
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जॅकब डफीने मार्च महिन्यात अतिशय प्रभावी प्रदर्शन केले. त्याने पाकिस्तानविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 8.38 च्या सरासरीने आणि 6.17 च्या इकॉनॉमीने एकूण 13 विकेट्स घेतल्या. डफीच्या या अविश्वसनीय प्रदर्शनामुळेच न्यूझीलंडने ही मालिका 4-1 ने जिंकली. याचबरोबर, मार्च अखेरीस पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यातही त्याने 2 बळी घेतले. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याचा ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’च्या शर्यतीत समावेश करण्यात आला आहे.