स्पोर्ट्स

Shreyas Iyer Injury Updates : ‘श्रेयस अय्यर’ ICU मधून बाहेर; गंभीर दुखापतीनंतर प्रकृती स्थिर

Shreyas Iyer ICU : संघाच्या डॉक्टरांना त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश

रणजित गायकवाड

ठळक बातम्या

  • श्रेयस अय्यरच्या उपचारात कोणतीही 'घाई' नाही

  • पूर्णपणे बरे झाल्यानंतरच मायदेशी परतणार

  • दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी श्रेयस अय्यरची उपलब्धता संदिग्ध

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर याची प्रकृती अद्यापही 'नाजूक' असली तरी ती स्थिर आहे. 'क्रिकबझ'ने २५ ऑक्टोबर रोजी सर्वप्रथम वृत्त दिल्याप्रमाणे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) संघाच्या डॉक्टरांना त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ३० वर्षीय अय्यरची प्रकृती सुधारत असल्याची माहिती मिळाली आहे. त्याला अतिदक्षता विभागातून (ICU) बाहेर हलवण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात, सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर, कव्हर क्षेत्रात शानदार झेल घेण्याच्या प्रयत्नात तो जमिनीवर पडला. ज्यात त्याच्या बरगडीला जोराचा मार बसला. या घटनेनंतर दोन दिवसांनी, सोमवारी (दि. २७) बीसीसीआयने एक निवेदन जारी केले. ‘२५ ऑक्टोबर रोजी सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना श्रेयस अय्यरच्या डाव्या बरगडीजवळ दुखापत झाली. पुढील तपासणीसाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,’ असे निवेदनात नमूद आहे.

‘स्कॅन केल्यानंतर त्याच्या प्लीहामध्ये (Spleen) दुखापत असल्याचे निदान झाले आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून, त्याची वैद्यकीय स्थिती स्थिर आहे आणि तो चांगला प्रतिसाद देत आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक सिडनी आणि भारतातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्याच्या दुखापतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. भारतीय संघाचे डॉक्टर श्रेयसच्या दैनंदिन प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी सिडनीमध्ये त्याच्यासोबत थांबणार आहेत,’ अशी माहितीही बीसीसीआयने दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यर आता धोक्याबाहेर आहे. मात्र, हर्षित राणाच्या गोलंदाजीवर अॅलेक्स कॅरीचा झेल घेताना झालेल्या आघातामुळे त्याला काही प्रमाणात अंतर्गत रक्तस्त्राव झाला असल्याचे समजते आहे. त्याला तत्काळ सिडनीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, भारतीय संघाचे डॉक्टर डॉ. रिझवान खान त्याच्यासोबत आहेत.

काही स्थानिक मित्र देखील त्याची विचारपूस करत आहेत. तसेच, व्हिसा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कुटुंबातील एक सदस्य मुंबईतून सिडनीला रवाना होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या अखेरीस अर्ज करता न आल्याने या प्रक्रियेला थोडा विलंब झाल्याचे समजते आहे.

सोमवारपर्यंत, अय्यर कधी मायदेशी परतणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु याबाबत घाई न करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. अय्यर पूर्णपणे बरा होईपर्यंत सिडनीमध्येच थांबण्याची अपेक्षा आहे. त्याला आणखी दोन दिवस रुग्णालयात राहावे लागू शकते.

सध्या राष्ट्रीय निवड समितीने केवळ एकदिवसीय क्रिकेटसाठी विचार केलेल्या अय्यरची पुढील महत्त्वाची मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एका महिन्यात होणार आहे. ३० नोव्हेंबर, ३ आणि ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या या तीन सामन्यांसाठी उपकर्णधार पूर्णपणे तंदुरुस्त होतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघ कॅनबेरा येथे पोहोचला आहे. येथे ते २९ ऑक्टोबर रोजी पाच टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT