नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघामधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरला संघात स्थान न मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करूनही त्याला वगळण्यात आल्याने क्रिकेट वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
भारतीय संघाच्या मधल्या फळीत सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांचे स्थान जवळपास निश्चित मानले जात होते. त्यामुळे उर्वरित दोन ते तीन जागांसाठी मोठी स्पर्धा होती. विशेषतः तिसर्या क्रमांकासाठी सध्याचा खेळाडू तिलक वर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्यात अटीतटीची स्पर्धा होती.
आशियाई क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या यापूर्वीच्या रुपरेषेप्रमाणे यंदाची आशिया चषक स्पर्धा 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान दुबई आणि अबू धाबी येथे होणार आहे. ही स्पर्धा टी-20 आंतरराष्ट्रीय स्वरूपात खेळवली जाईल आणि यात आठ संघ सहभागी होतील : अफगाणिस्तान, बांगला देश, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, यूएई, ओमान आणि हाँगकाँग.
तिलक वर्मा : दक्षिण आफ्रिकेतील दौर्यात तिलक वर्माने दोन शतकांसह 198.48 च्या प्रभावी स्ट्राईक रेटने 280 धावा केल्या होत्या. मात्र, आयपीएलमधील त्याची कामगिरी साधारण होती; त्याने 13 डावांत 31.18 च्या सरासरीने आणि 138.30 च्या स्ट्राईक रेटने 343 धावा केल्या.
श्रेयस अय्यर : याउलट, श्रेयस अय्यरने आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्जकडून खेळताना चमकदार कामगिरी केली. एका हंगामात 600 हून अधिक धावा करणार्या फलंदाजांमध्ये ख्रिस गेल (2011) आणि सूर्यकुमार यादव (2023) यांच्यानंतर 175.07 चा त्याचा स्ट्राईक रेट सर्वाधिक होता.
एवढी दमदार कामगिरी करूनही निवड समितीने श्रेयसच्या नावाचा विचार केला नाही. इतकेच नव्हे, तर राखीव खेळाडूंमध्येही त्याला स्थान देण्यात आलेले नाही. या निर्णयामुळे निवड समितीच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे असले तरी, बीसीसीआय-पीसीबी यांच्यातील करारानुसार, भारत किंवा पाकिस्तानात स्पर्धा आयोजित झाल्यास दोन्ही संघांमधील सामने तीन वर्षांसाठी तटस्थ ठिकाणी खेळवले जातील. या करारामुळेच सामने यूएईमध्ये हलवण्यात आले आहेत. दुबईमध्ये 11 सामने, तर अबू धाबीमध्ये 8 सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना 9 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात अबू धाबी येथे होईल.
10 सप्टेंबर : भारत विरुद्ध यूएई (दुबई)
14 सप्टेंबर : भारत विरुद्ध पाकिस्तान (दुबई)
19 सप्टेंबर : भारत विरुद्ध ओमान (अबू धाबी)
साखळी फेरीनंतर, प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर-4 फेरीत प्रवेश करतील. ही फेरी 20 ते 26 सप्टेंबर दरम्यान चालेल. जर भारतीय संघ गट ‘अ’ मध्ये अव्वल स्थानी राहिला, तर त्यांचे सुपर-4 फेरीतील सर्व सामने दुबईत होतील. मात्र, संघ दुसर्या स्थानी राहिल्यास, एक सामना अबू धाबीत आणि उर्वरित दोन सामने दुबईत खेळवले जातील. स्पर्धेचा अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी दुबईत पार पडेल.
गट ‘अ’: भारत, पाकिस्तान, यूएई, ओमान
गट ‘ब’: श्रीलंका, बांगला देश, अफगाणिस्तान, हाँगकाँग