Shreyas Iyer:
नवी दिल्ली : भारतीय उपकर्णधार श्रेयस अय्यरला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. बीसीसीआयने शनिवारी ही माहिती दिली. २५ ऑक्टोबर रोजी सिडनी येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अय्यरला दुखापत झाली होती. तेव्हापासून त्याच्यावर सिडनीतील रुग्णालयात उपचार सुरू होते.
बीसीसीआयने सांगितले की, “श्रेयसची प्रकृती स्थिर आहे आणि चांगल्या प्रकारे बरा होत आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमला तसेच सिडनी आणि भारतातील तज्ञ डॉक्टरांनाही त्याच्या प्रकृतीतील सुधारणा पाहून आनंद झाला आहे. त्यामुळे त्याला आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.”
संघाने पुढे म्हटलं की, “बीसीसीआय सिडनीतील डॉ. कुरुश हघीघी आणि त्यांच्या टीमचे तसेच भारतातील डॉ. दिनशॉ परदीवाला यांचे मनःपूर्वक आभार मानते. त्यांनी श्रेयसला त्याच्या दुखापतीनंतर सर्वोत्तम उपचार दिले. श्रेयस आता फॉलो-अप कन्सल्टेशनसाठी सिडनीतच राहील आणि पूर्णपणे फिट असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतरच तो भारतात परत येईल.”
२५ ऑक्टोबर रोजी सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात क्षेत्ररक्षण करताना श्रेयसला ही दुखापत झाली होती. ऑस्ट्रेलियाच्या डावातील ३४व्या ओव्हरमध्ये हर्षित राणाच्या चेंडूवर अॅलेक्स कॅरीने फटका मारला. श्रेयसने पॉईंटवरून थर्डमॅनच्या दिशेने धावत जाऊन झेल पकडला, पण झेल घेताना त्याचा तोल गेला आणि त्याच्या डाव्या बरगडीला दुखापत झाली.