स्पोर्ट्स

Ricky Ponting’s Explosive Claim : ‘माझ्यामुळे श्रेयस अय्यर टीम इंडियाचा कॅप्टन झाला!’, रिकी पाँटिंग यांचा मोठा खुलासा

Shreyas Iyer Captaincy : ९०० दिवसांचा वनवास संपला! अफाट कष्ट आणि कमालीच्या संयमाचे फळ; श्रेयस अय्यर बनला भारताचा नवा टी-२० कर्णधार

रणजित गायकवाड

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरला अखेर त्याच्या अथक परिश्रमाचे फळ मिळाले आहे. जवळपास ९०० हून अधिक दिवस आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतरही, निवडकर्त्यांनी त्याच्यावर थेट भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून हटवण्याच्या निर्णयाचे बहुतांश क्रिकेट तज्ज्ञांनी समर्थन केले असले, तरी त्याला संघातूनच वगळण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, आयपीएलमध्ये श्रेयससोबत काम केलेले ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू आणि पंजाब किंग्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग या निर्णयामुळे प्रचंड आनंदित झाले आहेत. पंजाब किंग्सने आयपीएल लिलावात मोठी बोली लावून श्रेयसला संघात समाविष्ट केले होते आणि तेव्हापासून या जोडीने उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. पंजाबच्या संघाने मागील हंगामात अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती, तर चालू हंगामात चांगली सुरुवात करूनही त्यांना प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही.

पाँटिंग यांच्याकडून श्रेयसचे भरभरून कौतुक

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वगुणांचे कौतुक करताना रिकी पाँटिंग म्हणाले, ‘मागील तीन वर्षांतील आयपीएलचा आलेख पाहिला, तर श्रेयसने आधी कोलकाता नाईट रायडर्सला विजेतेपद मिळवून दिले. त्यानंतर पंजाब किंग्सचे कर्णधारपद सांभाळताना गेल्या वर्षी संघाला अंतिम फेरीत धडक मारून दिली. यंदाच्या हंगामात, पंजाबचा संघ दुर्दैवाने प्ले-ऑफमध्ये पोहोचू शकला नसला, तरी श्रेयसचे नेतृत्व दर्जेदार राहिले. मात्र, या सर्व यशापेक्षाही गेल्या ३-४ वर्षांतील प्रतिकूल परिस्थितीत त्याने स्वतःला ज्या संयमाने हाताळले आणि मैदानावर व मैदानाबाहेर जे परिपक्व वर्तन राखले, त्याने मला सर्वाधिक प्रभावित केले आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘भारतीय संघात काही मालिका किंवा सामन्यांसाठी आपली निवड व्हायला हवी होती, असे श्रेयसला अनेकदा वाटले असणार यात शंका नाही. मात्र, संघात स्थान न मिळाल्याने खचून न जाता त्याने नेहमी आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केले. अत्यंत संयमाने आणि कठोर परिश्रमाने त्याने आपले काम सुरू ठेवले. याच जिद्दीच्या जोरावर तो चार-पाच वर्षांपूर्वी होता, त्यापेक्षा आज कितीतरी पटीने उत्तम खेळाडू बनला आहे.’

‘मीच निवडकर्त्यांना कॅप्टन्सीसाठी श्रेयसचे नाव सुचवले’

पंजाब किंग्सच्या मुख्य प्रशिक्षकांनी एक मोठा खुलासा करताना सांगितले की, ‘भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारपदासाठी मीच सातत्याने श्रेयसच्या नावाचा पाठपुरावा करत होतो. जर तुम्ही श्रेयसला एकदा संधी दिली, तर तो तुम्हाला कधीही निराश करणार नाही, असे मी भारतीय निवडकर्त्यांना वारंवार सुचवत होतो. दीर्घकाळापासून त्याने घेतलेल्या अफाट कष्टांची ही एक प्रकारे योग्य पावतीच आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, भारतीय संघाचा कर्णधार म्हणून तो आगामी काळात अत्यंत यशस्वी कामगिरी करेल.’

आगामी काळातील आशिया चषक, २०२८ चे ऑलिम्पिक आणि टी-२० विश्वचषक यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धा डोळ्यांसमोर ठेवून भारतीय निवड समितीने टी-२० संघात हे मोठे फेरबदल केले आहेत. यानुसार सूर्यकुमार यादवला संघातून बाहेरचा रस्ता दाखवत, क्रिकेटच्या या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये भारताची धुरा आता श्रेयस अय्यरच्या सक्षम हातांत देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT