श्रेणिक नरदे
ब्रिस्बेनच्या मैदानात भारतीय क्रिक्रेट संघाने कसोटी क्रिकेट सामन्यांची मालिका जिंकली आणि देशभरातून भारतीय क्रिकेट संघावर कौतुकाचा वर्षाव झाला. साहजिकच विजयी संघाचा कर्णधार असणाऱ्या अजिंक्य रहाणेचंही कौतुक जगभरातून होत आहे.
विराट कोहली मायदेशी परतल्यानंतर कर्णधारपदाची धूरा अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर आली. त्या जबाबदारीला योग्य न्याय किंबहुना आदीच्या कर्णधारांपेक्षा उत्तम नेतृत्व त्याने केले आणि विजयी पताका लावली.
या सर्व जय-पराजय, ऑस्ट्रेलिया – भारत, काळे-गोरे, खेळातले रेकॉर्ड याच्याविषयी चर्चा नंतर करता येईल. मात्र अजिंक्यने दाखवलेला संयम, शांतता, ऋजुता, प्रगल्भपणा, सोबत्यांवरचा विश्वास, त्याचा नम्रपणा यांची चर्चा करणे आज आवश्यक वाटते.
देशभरातच काय जगभरातच कलकलाट, दणदणाट, दंगा, धुडगूस, धूरळा, राडा, धिंगाणा अशा उन्मादाच्या चढत्या कमानींवर बागडणाऱ्या लोकांना पाहून अजिंक्य रहाणेचा संयमी स्वभाव हा वाळवंटातल्या पाण्याच्या झऱ्याएवढाच शीतल भासतो आहे.
ऑस्ट्रेलिया आणि भारत हे दोन्ही संघ दिग्गज आहेत. मात्र हा संघ बऱ्यापैकी नवखा होता. दोन्ही बाजूचे क्रिकेटचे चाहते एकाला झाकावा आणि दूसऱ्याला काढावा असे. त्या ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी नवख्या मोहमद सिराज आणि जसप्रीत बुमराह या दोघांना खिजवणाऱ्या वर्णद्वेषी घोषणा दिल्या. नवे खेळाडू या प्रकारामुळे आत्मविश्वास गमावू शकतात. त्यांच्या मनावर परिणाम होऊ शकतो याची नोंद घेत खेळ जागच्या जागी थांबविण्याचा निर्णय घेणारा कर्णधारही अजिंक्यच होता. हुल्लडबाज प्रेक्षकांवर कारवाई झाल्यानंतर खेळ पुर्ववत सुरू झाला. २-१ अशा फरकाने ही मालिका जिंकून भारतीय संघाने सर्व टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
या खेळादरम्यान अजिंक्यचा मैदानातील सहजसुलभ वावर पाहिला असाल तर जाणवलं असेल की, एखाद्या गोलंदाजाला मार पडत असेल तरी त्याला रागावणं नाही की, त्याला त्याची जाणीव करून देण्याजोगंही वर्तन अजिंक्यचं नव्हंतं. अजिंक्यने सर्व खेळाडूंवर विश्वास दाखवला, त्या खेळाडूंनीही हा त्याचा विश्वास सार्थ ठरवला.
एकूणच काय तर अधिकारपद मिळाल्यावर त्यासोबत जबाबदारी येते याचं भान फार कमी लोकांना असतं. अधिकारपद म्हणजे मिरवण्यासाठी असतं असा बहुतेकांचा गैरसमज असतो, त्या मिरवण्याच्या मग्रूरीतच सहकाऱ्यांना न जूमानने, सतत उपदेशांचे डोस देत राहणे, पराभवाचे खापर फोडण्यासाठी डोक्यांचा शोध घेणे. अशाच गोष्टींत आपले बरेच उच्चपदस्थ गुंतलेले असतात. त्यांना किमान अजिंक्य रहाणेचा खेळ, त्याची वर्तणूक पाहून आपल्या कर्तव्यांची, आपल्या सहकाऱ्यांप्रति संवेदनशीलपणाने वागण्याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही.
अजिंक्य रहाणेच्या संघावर ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी वर्णद्वेषी टीका केली. मूळात ऑस्ट्रेलिया हा देशच वर्णवर्चस्ववादी मानसिकतेत रमलेला आहे, अनेक भारतीय लोकांच्या हत्या अमेरिकेत वर्णवर्चस्ववादी मानसिकतेतून झालेल्या आहेत. ही सर्व किनार असतानाही प्रतिस्पर्धी संघातील न्याथन लियन या गोलंदाजाने १०० कसोटी सामने खेळल्याबद्दल त्याचं अभिनंदन करण्यासाठी त्याला सर्व भारतीय खेळाडूंच्या सह्या असलेली जर्सी भेट दिली.
काल त्याचं मुंबईमधील घरी आगमन झालं. मोठ्या उत्साहाने ढोलताशांच्या गजरात अजिंक्य रहाणेचं स्वागत झालं. आपल्या भारतीय खुनशी मानसिकतेला अनुसरून कुणीतरी अजिंक्य रहाणेसमोर कांगारूची प्रतिकृती असणारा केक कापण्यासाठी धरला. नम्रपणे नकार देत अजिंक्यने तो केक कापला नाही.
खेळ हा मैदानावर खेळायचा असतो, मैदानावर एकमेकाचे विरोधक पण सीमारेखा ओलांडल्यानंतर मित्रत्वाची भावना जपायची असते हे अजिंक्यने कृतीतून दाखवले आहे. अजिंक्यसमोर कांगारूची प्रतिकृती असलेला केक धरणाऱ्या मानसिकतेच्या लोकांना अजिंक्यने आपल्या वागण्यातून भरपूर काही शिकवलं.
आपल्याकडे हुल्लडबाजांना विक्रम, शिवीगाळ, दंगा ह्या भानगडीतच रस असतो. एखाद्यावेळी मनाजोगता खेळ झाला नाही तर हे लोक आपल्याच खेळाडूंविरोधातही खूप खालच्या पातळीवर घसरून लाज आणत असतात.
दोनवेळा विश्वकरंडक मिळवून देणाऱ्या कर्णधार धोनीलाही यंदाच्या आयपीएल दरम्यान काय दिलं भारतीयांनी ? चेन्नई सुपर किंग्ज कडून खेळताना खराब कामगिरी झाली म्हणून धोनीच्या लहानग्या मुलीवर टिप्पणी करण्यापर्यंत या लोकांची मजल पोहोचली होती.
आज देशच काय जगचं, नालायकपणाच्या सीमा ओलांडण्याबाबतीत स्पर्धा करत आहेत. लोकशाही प्रक्रियेने मिळालेला पराभवाचा कौलही महासत्तेच्या माजी राष्ट्राध्यक्ष समर्थकांना स्वीकारता आला नाही. त्या उद्विगनतेतून त्यांनी सर्वोच्च सभागृहात नंगानाच केला.
दूसऱ्या बाजूला आपल्या देशात आंदोलनासारख्या संविधानिक मार्गाने चालणाऱ्या लोकांना खलिस्तानी, नक्षलवादी ठरवणारा वर्ग असेल कि गावागावातील ग्रामपंचायत निवडणुकीनंतर विरोधकांना 'आमच्याशी वाकडं तर नदीवर लाकडं!' अशी धडकी भरवणाऱ्या घोषणा देणारा वर्ग असो हे तत्वतः एकाच जातकुळीचे!
या साऱ्या आसपासच्या हुल्लडबाजांच्या उन्मादी जल्लोषात, अजिंक्य कोठेही नाही याचा आनंद मानावा तितका थोडा आहे. आज जर अजिंक्य भारतातल्या क्रिकेटप्रेमींना एवढा प्रिय झालाच असेल तर त्याच्या चार गोष्टी आपणही आत्मसात करायला हरकत नसावी.