स्पोर्ट्स

Shivam Dube : स्वप्नपूर्तीचा क्षण! घरी परतताच शिवम दुबेने वडिलांना घातले विश्वविजेतेपदाचे पदक; भावनिक Video व्हायरल

T20 World Cup winner medal : वडिलांच्या गळ्यात पदक आणि 'रिअल हिरो'ची दाद

रणजित गायकवाड

मुंबई : भारतीय संघाला टी-२० विश्वचषक २०२६ चे जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आहे. विश्वविजेता बनल्यानंतर घरी परतताच दुबेने आपल्या यशाचे पदक वडिलांच्या गळ्यात घातले असून, या हृदयस्पर्शी प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अष्टपैलू कामगिरीने गाजवला विश्वचषक

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ८ मार्च रोजी पार पडलेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले. या संपूर्ण स्पर्धेत अनेक खेळाडूंनी निर्णायक क्षणी चमकदार कामगिरी केली, त्यापैकी एक म्हणजे शिवम दुबे. त्याने फलंदाजीमध्ये 'फिनिशर'ची भूमिका चोख बजावलीच, शिवाय गोलंदाजीतही महत्त्वाची साथ देत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. विश्वचषक जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दुबे अहमदाबादहून थेट आपल्या घरी मुंबईला रवाना झाला.

वडिलांच्या गळ्यात पदक आणि 'रिअल हिरो'ची दाद

सलग दोन टी-२० विश्वचषकांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिवम दुबेने यंदा जेतेपद पटकावल्यानंतर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. मुंबईत घरी पोहोचल्यानंतर त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये त्याचे वडील भारतीय संघाची जर्सी परिधान केलेले दिसत आहेत. दुबेने अत्यंत आदराने आपल्या विजयाचे पदक वडिलांच्या गळ्यात घातले आणि "माझ्या आयुष्यातील खरा नायक" (Real Hero) असे कॅप्शन दिले.

विशेष म्हणजे, अहमदाबादहून मुंबईला परतताना विमान उपलब्ध नसल्यामुळे दुबेने रेल्वेने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. चाहत्यांची गर्दी टाळण्यासाठी त्याने चेहरा झाकून, रेल्वे सुटण्याच्या केवळ ५ मिनिटे आधी थ्री-टियर डब्यात प्रवेश केला आणि थेट 'अपर बर्थ'वर जाऊन विश्रांती घेतली. त्याच्या या साधेपणाचेही सर्वत्र कौतुक होत आहे.

विश्वचषकातील आकडेवारीवर एक नजर

टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये शिवम दुबेची कामगिरी अत्यंत प्रभावी राहिली. त्याने ९ सामन्यांतील ८ डावांत ३९.१६ च्या सरासरीने २३५ धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १६९.०६ इतका जबरदस्त होता आणि त्याने एक अर्धशतकही झळकावले. त्याला ९ सामन्यांतील ५ डावांत गोलंदाजी करण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये त्याने २९.२ च्या सरासरीने ५ बळी टिपले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT