Shikhar Dhawan Viral Post Pudhari
स्पोर्ट्स

Shikhar Dhawan Post: माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल... दुसऱ्या लग्नानंतर शिखर धवनचा संताप, पोस्ट व्हायरल

Shikhar Dhawan Viral Post: भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनने दुसऱ्या लग्नानंतर सोशल मीडियावर पसरवलेल्या खोट्या पोस्टवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या नावाने बनावट पोस्ट व्हायरल केल्याबद्दल त्याने स्पष्टीकरणं दिलं आहे.

Rahul Shelke

Shikhar Dhawan Viral Post Second Marriage: भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर फलंदाज शिखर धवन सध्या चर्चेत आहे. पण यावेळी क्रिकेटमधील कामगिरीमुळे नव्हे, तर वैयक्तिक आयुष्याबाबत सोशल मीडियावर पसरवण्यात आलेल्या खोट्या पोस्टमुळे.

अलीकडेच धवनने आयर्लंडची सोफी शाइन हिच्याशी दुसरे लग्न केले. जवळपास दीड वर्षांच्या नात्यानंतर मागील महिन्यात दोघांनी साखरपुडा केला होता. याआधी धवनचे आयशा मुखर्जी यांच्याशी लग्न झाले होते, मात्र ऑक्टोबर 2023 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. या काळात मुलगा जोरावरच्या कस्टडीसाठी कायदेशीर लढाईही झाली. धवनने अनेकदा मुलाला भेटता येत नसल्याची खंत व्यक्त केली, मात्र कधीही त्याने पहिल्या पत्नीविरोधात सार्वजनिक वक्तव्य केले नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर काही बनावट पोस्ट व्हायरल झाल्या, ज्यात धवनच्या नावाने पहिल्या लग्नाबाबत वादग्रस्त विधानं करण्यात आली होती. यामुळे संतप्त झालेल्या धवनने थेट सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिलं.

X या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत धवन म्हणाला की, “माझ्या खासगी आयुष्याबद्दल काही खोट्या पोस्ट मी पाहिल्या आहेत. मी कधीच भूतकाळ मनात ठेवून जगत नाही. मैदानावर असो वा मैदानाबाहेर. मी सकारात्मकतेवर विश्वास ठेवतो आणि माझ्या भूतकाळाचा आदर करतो.

माझ्या आयुष्यात हा एक नवा अध्याय आहे. चाहत्यांकडून, कुटुंबीयांकडून, मित्रांकडून आणि शुभेच्छुकांकडून मिळालेल्या प्रेमासाठी मी मनापासून आभारी आहे. कृपया क्लिकबेट आणि खोट्या विधानांसाठी माझं नाव वापरू नका. प्रेम आणि सकारात्मकता पसरवूया.” धवनच्या या पोस्टनंतर चाहत्यांनीही त्याला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, सोफी शाइनबाबत सांगायचं झालं तर तिने आयर्लंडमधील कॅसलरॉय कॉलेजमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर लिमरिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मार्केटिंग आणि मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे. सध्या ती ‘डा वन स्पोर्ट्स’मध्ये चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून कार्यरत असून ‘शिखर धवन फाउंडेशन’ची जबाबदारीही सांभाळते. गेल्या काही काळापासून ती भारतातच वास्तव्यास आहे.

एकीकडे वैयक्तिक आयुष्यात नवा टप्पा सुरू असताना, दुसरीकडे सोशल मीडियावरील अफवा आणि चुकीच्या पोस्टमुळे धवनला स्पष्टीकरण द्यावं लागलं. मात्र, या सगळ्या गोंधळातही धवनने संयम राखत सकारात्मकतेचा संदेश देत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT