Commonwealth Games 2026 Sharmila Dhankar Inspirational Sports Story
नवी दिल्ली: हरियाणातील अत्यंत गरीब कुटुंबात जन्म, लहानपणी पोलिओमुळे आलेले अपंगत्व, पहिल्या विवाहात सहन केलेला कौटुंबिक छळ आणि आर्थिक संकटांचा डोंगर... या सर्व संकटांवर मात करत भारताच्या पॅरा अॅथलीट शर्मिला धनकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. भारतासाठी राष्ट्रकुल स्पर्धेतील पॅरा अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच खेळाडू ठरली आहे.
सोमवारी रात्री शर्मिलाने महिला एफ-५७ गोळाफेक प्रकारात हंगामातील सर्वोत्तम ९.८१ मीटर फेक नोंदवत सुवर्णपदक पटकावले. या कामगिरीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेतील पॅरा अॅथलेटिक्समध्ये भारताची तब्बल २० वर्षांची पदकांची प्रतीक्षा संपुष्टात आली. यापूर्वी २००६ मध्ये रणजित कुमार जयसीलनने बसून डिस्कस थ्रो प्रकारात पदक जिंकले होते.
एफ-५७ गटात खालच्या अवयवांमध्ये अपंगत्व, अवयवांची कमतरता किंवा स्नायूंची ताकद कमी असलेल्या खेळाडूंचा समावेश होतो. गोळाफेकीबरोबरच शर्मिला डिस्कस थ्रोमध्येही खेळते. राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वी तिने दुबईतील फज्जा आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत गोळाफेकीत सुवर्ण, तर डिस्कस थ्रोमध्ये कांस्यपदक जिंकले होते.
हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यातील गरीब शेतकरी कुटुंबात वाढलेल्या शर्मिलाला वयाच्या दुसऱ्या वर्षी पोलिओ झाला. त्यामुळे तिच्या उजव्या पायावर परिणाम झाला. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. "माझी आई अंध होती, वडील शेतकरी होते. घरात दोन वेळचे जेवण मिळणेही कठीण होते. आयुष्य कधीच सोपे नव्हते," असे शर्मिलाने सांगितले.
अवघ्या १९व्या वर्षी तिचा विवाह झाला. मात्र पहिल्या वैवाहिक आयुष्यात तिला सतत कौटुंबिक छळाचा सामना करावा लागला. अखेर दोन मुलींना घेऊन तिने माहेरी परतण्याचा निर्णय घेतला. त्या आठवणी सांगताना शर्मिला म्हणाली, "एका रात्री माझ्या पहिल्या पतीने रात्री ११ वाजल्यापासून पहाटे ३ वाजेपर्यंत मला बेदम मारहाण केली आणि घराबाहेर हाकलून दिले. त्यानंतर मी पुन्हा कधीच त्या घरी परत गेले नाही."
शर्मिलाच्या आयुष्यातील खरा बदल दुसऱ्या विवाहानंतर झाला. तिचे पती अजित सिंहने तिला पॅरा क्रीडा क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन दिले. प्रशिक्षक टेकचंद आणि देवेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली तिने सराव सुरू केला. विशेष म्हणजे, शर्मिलाने वयाच्या ३४व्या वर्षी खेळात प्रवेश केला. २०२१ मध्ये पॅरा राष्ट्रीय स्पर्धेत पदार्पण करताच राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकले.
२०२२ च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत ती चौथ्या क्रमांकावर राहिली आणि पदक थोडक्यात हुकले. २०२३ च्या हांगझोऊ आशियाई पॅरा स्पर्धेतही तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. दरम्यान, आर्थिक अडचणी कायम असल्याने २०२३ मध्ये खेळाचा खर्च भागवण्यासाठी कुटुंबाने रेवारीतील स्वतःचे घर विकले आणि भाड्याच्या घरात राहायला सुरुवात केली. "खेळाने मला दुसरे आयुष्य दिले. यंदा राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धांमध्ये पदके जिंकल्यानंतर पुन्हा स्वतःचे घर घेण्याचे माझे स्वप्न आहे," असे शर्मिला म्हणाली.
गेल्या वर्षी नवी दिल्लीतील जागतिक पॅरा अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत शर्मिला पाचव्या क्रमांकावर राहिली होती. मात्र पदकांपेक्षा तिच्या आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न म्हणजे आपल्या दोन्ही मुलींना तिला भोगावा लागलेला संघर्ष कधीच अनुभवावा लागू नये. मोठी मुलगी अंजू (१५) अंडर-१६ भालाफेक स्पर्धेत खेळते, तर धाकटी लक्ष्मी (१३) अंडर-१४ लांब उडीची खेळाडू आहे. आपल्या मुलींना खेळाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य मिळावे, अशीच शर्मिलाची इच्छा आहे.