पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाजी अष्टपैलू शार्दुल ठाकूर सध्या त्याच्या उत्कृष्ठ खेळीमुळे चर्चेत आहे. रणजी ट्रॉफीमध्ये त्याने आपल्या कामगिरीने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुंबईकडून खेळताना त्याने रणजी ट्रॉफीच्या शेवटच्या सामन्यात फलंदाजीने कहर केला. शार्दुलने जम्मू आणि काश्मीरविरुद्ध पहिल्या डावात अर्धशतक आणि दुसऱ्या डावात शतक झळकावले होते. आता त्याने गोंलदाजीमध्येही कहर केला आहे. ३० जानेवारी रोजी सुरू झालेल्या मेघालय विरुद्धच्या सामन्यात त्याने हॅटट्रिक घेतली आणि त्यांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. त्याच्या घातक गोलंदाजीमुळे मेघालय संघ पूर्णपणे गारद झाला आहे. त्याचा अर्धा संघ फक्त 2 धावांवर बाद झाला. यानंतर फलंदाजीसाठी अलेल्या संगमा आणि आकाश चौधरी यांनी डाव सांभाळला
रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून हॅटट्रिक घेणारा शार्दुल ठाकूर हा पाचवा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी, मुंबईच्या ४ गोलंदाजांनी ही कामगिरी केली आहे. ज्याची सुरुवात जहांगीर खोतने केली होती. १९४३-४४ च्या हंगामात त्याने बडोद्याविरुद्ध ही कामगिरी केली. त्यांच्यानंतर, उमेश नारायण कुलकर्णीने १९६४-६५ च्या हंगामात गुजरातविरुद्ध हॅटट्रिक घेतली आणि अब्दुल इस्माइलने १९७३-७४ च्या हंगामात सौराष्ट्रविरुद्ध हॅटट्रिक घेतली. त्यानंतर रॉयस्टन डायसने २०२३-२४ हंगामात बिहारविरुद्ध हा पराक्रम केला. आता शार्दुल ठाकूरने मेघालयविरुद्ध त्याची पुनरावृत्ती केली आहे.
मुंबई आणि मेघालय यांच्यातील हा सामना शरद पवार क्रिकेट अकादमीमध्ये खेळला जात आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्याने शार्दुल ठाकूर आणि मोहित अवस्थी यांच्याकडे गोलंदाजीची जबाबदारी सोपवली. पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर निशांत चक्रवर्तीला बाद करून शार्दुलने मेघालयला पहिला धक्का दिला. दुसऱ्या षटकात मोहितने एक विकेट घेतली.
तिसऱ्या षटकाच्या पहिल्या ३ चेंडूंवर शार्दुलने १ धाव दिली. आता धावसंख्या २ विकेटच्या मोबदल्यात २ धावा होत्या. त्यानंतर त्याने चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर सलग तीन विकेट घेत हॅटट्रिक पूर्ण केली आणि मेघालय संघाचा अर्धा भाग पॅव्हेलियनमध्ये पाठवला. यानंतरही विकेट्सचा क्रम सुरूच राहिला. या सामन्यामध्ये शार्दुलने ९ षटकांत २७ धावा देत ४ बळी घेतले आहेत. तर मोहित अवस्थीने ६ षटकांत १५ धावा देत ३ बळी घेतले आणि सिल्वेस्टर डिसूझाने ५ षटकांत १२ धावा देत १ बळी घेतला.